राष्ट्रवादीत अंतर्गत कलह, पार्थ पवारांनी घेतली फडणवीसांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याने या नाराजीनाट्याला सुरुवात झाली. यानंतर पक्षाकडून याबाबत स्पष्टीकरण देत निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणी यादीत नसणे हि प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाला नव्या कार्यकारिणी यादीबाबत लवकरच पत्र पाठवले जाईल असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही हि खरंच एक प्रिंटिंग मिस्टेक होती कि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेला अप्रत्यक्ष संदेश होता याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. अश्यातच पार्थ पवार यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या भेटीनंतर राष्ट्रवादी पक्षात काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पार्थ पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानाच्या भेटीनंर पुढे काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी पक्षातील नाराजीनाट्यावरून अद्याप काही प्रतिक्रिया फिली नसली तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार पटेल आणि तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ले चढवत आहेत. “अजित पवार यांनी शेवटच्या चार महिन्यांत माझ्याशी बोलताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे राष्ट्रवादीतील २२ आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन तटकरे आणि पटेल यांच्या कामाचे आणि अनुभवाचे कौतुक केले होते. आता पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरणात पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत.






