'बाळासाहेबांचा नातू स्वतःला झुरळ म्हणतो, तर बाप काय म्हणतो ?' प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
मुंबई: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या विजयी जल्लोषावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरे बंधूंनी आंदोलनाच्या यशाचा आनंदोत्सव साजरा केल्यानंतर महाजन यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
प्रकाश महाजन म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने ठाकरे कुटुंबाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले होते. मात्र, आज राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना वेगळी भूमिका घ्यावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांनी ठाकरे बंधूंनी आंदोलनादरम्यान केलेल्या काही विधानांचा संदर्भ देत त्यांच्यावर उपरोधिक टीका केली.
Rohit Pawar News: TET घोटाळ्यातील आरोपी आणि भाजप नेत्याचे आर्थिक कनेक्शन ! रोहित पवारांचा गंभीर आरोप
महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना, “बाळासाहेबांचा नातू स्वतःला झुरळ म्हणतो, तर बाप काय?” असा सवाल उपस्थित केला. तसेच “झुरळाला विष्णूचा अवतार म्हणण्याची वेळ आली आहे,” अशी खोचक टिप्पणी करत त्यांनी ठाकरे कुटुंबाच्या राजकीय भूमिकेवर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांना वाघाची उपमा दिली जायची, मात्र त्यांच्या वारसांकडून होत असलेली भाष्ये पाहून आश्चर्य वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांच्यावरही प्रकाश महाजन यांनी टीका केली. “जेनझीने झिंज्या उपटल्या” या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी त्याची खिल्ली उडवली. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील प्रभावी नेते असून त्यांच्याकडे राज्याच्या पलीकडेही वातावरण बदलण्याची क्षमता आहे. मात्र, त्यांनी अशा प्रकारच्या राजकीय भाषेचा आधार घेऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाजन यांनी पुढे म्हटले की, शिवाजी पार्कवरील जल्लोषातून युवकांना कोणता संदेश दिला जात आहे, याचाही विचार होणे आवश्यक आहे. आंदोलनानंतर निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाचा काही पक्ष आपल्या फायद्यासाठी वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विविध पक्षांकडून परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत. एका बाजूला विरोधक हा निर्णय विद्यार्थी आंदोलनाचा विजय असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेते या प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टीने पाहत आहेत. अशा परिस्थितीत शिवाजी पार्कवरील विजयी जल्लोष आणि त्यानंतर सुरू झालेली आरोप-प्रत्यारोपांची मालिका राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापवण्याची चिन्हे दिसत आहेत.






