मतपेट्यांमध्ये घालमेल करण्याची संधी सरकारला मिळू शकते (फोटो - सोशल मीड़िया)
कराड : काँग्रेसचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे काँग्रेस कधीही संपू शकत नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातून सुरू झालेला काँग्रेसचा प्रवास आजही जनतेच्या मनात जिवंत आहे. काँग्रेसने देशाच्या प्रगतीसाठी सत्ताकाळात उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र, सत्तेसाठी भाजपने खोट्या आरोपांवर आधारित नरेटिव्ह तयार करत जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवली, असा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
कराड काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, अजित पाटील, झाकीर पठाण, निवासराव थोरात, बंडानाना जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 2014 मध्ये भाजपने काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून सत्तेवर येण्याचा मार्ग शोधला. मात्र, नंतर हे आरोप न्यायालयात सिद्ध झाले नाहीत आणि काँग्रेसचे नेते निर्दोष ठरले. तरीही काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. याउलट भाजपच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. भाजपकडे स्वतःचे कार्यकर्ते किंवा संघटनात्मक ताकद नसल्याने काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्त्यांना गळाला लावून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपलाही पक्ष वाढवण्यासाठी काँग्रेसच्याच नेत्यांची गरज लागली, असा टोला कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करणारी भाजप आज काँग्रेसयुक्त झाली आहे, हे त्यांनाही कळले नाही,” अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातील निवडणूक निकाल अनपेक्षित होते. आजचे आमदार हे जनतेने निवडलेले नसून “इव्हिएम आमदार’ आहेत,” अशी टीका काँग्रेस नेते अजित पाटील यांनी केली. काँग्रेसने लोकशाही मूल्ये जपली, तर भाजपने ती पायदळी तुडवली आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आधी फडणवीस आणि अमित शहा यांना त्यांच्याबद्दल विचारावे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
पुढे ते म्हणाले की, “सत्तेचा गैरवापर करत भाजपने ईडी, सीबीआय, आयटी आदी यंत्रणांचा वापर करून काँग्रेस नेत्यांवर दबाव टाकला. विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेताना त्यांना क्लिनचिट दिली जात आहे. हा प्रकार लोकशाहीच्या मुल्यांना धक्का देणारा असून भाजपने केवळ सत्तेसाठी देशातील धार्मिक सलोखा आणि शांतता बिघडवली आहे,” असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“भाजपने विकासाचे जे आकडे मांडले आहेत, ते खोटे असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. कोणतीही ठोस विकासनीती राबवलेली नाही. धार्मिक ध्रुवीकरण करून सत्तेवर टिकण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा देश कधीही प्रगती करू शकत नाही, हे जागतिक इतिहासाने सिद्ध केले असल्याचे देखील कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.






