एखाद्याच्या घरात थेट जाऊन बेडरूमपर्यंत स्टिंग ऑपरेशन करणे हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : निवडणुकीच्या काळात कुठेही पैसे सापडले तर निवडणूक आयोग त्यासंदर्भात कारवाई करते. पोलिसांनाही त्या संदर्भात हस्तक्षेप करून आवश्यक ती कारवाई करावी लागते. त्यामुळे या घटनेत घरात पैसे सापडले आहे, बेडरूममध्ये पैसे ठेवलेले दिसत आहेत. ते जमिनीच्या व्यवहारातून आले का? अन्य कोणत्या व्यवहारातून आले का? कोणत्या कारणासाठी ते पैसे आहेत, याची चौकशी करणे आवश्यक आहे. पण, एखाद्याच्या घरात थेट जाऊन बेडरूमपर्यंत ‘स्टिंग ऑपरेशन’ करणे हे योग्य नसल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बावनकुळे यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘आज असं म्हणणं की भाजप कार्यकर्त्यांच्या घरात पैसे सापडले आणि एखाद्याच्या घरात थेट जाऊन बेडरूमपर्यंत स्टिंग ऑपरेशन करणे हे योग्य नाही. निलेश राणे यांनी हे असं का केलं हे मला समजत नाही. पण बेडरूमपर्यंत जाऊन अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करणे हे निश्चितच नियमबाह्य वाटतं. त्याऐवजी त्यांनी हे प्रकरण पोलिस किंवा निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं असतं तर अधिक योग्य ठरलं असतं. या प्रकरणात निवडणूक आयोग आणि पोलीस योग्य ती कारवाई करतील’.
हेदेखील वाचा : मी स्टार प्रचारक कशाला हिशोब लागतोय; निवडणूक आयोगाबाबत बावनकुळे हे काय गेले बोलून? Video तुफान व्हायरल
दरम्यान, सरकारच्या योजनांची संपूर्ण मांडणी आणि कुठे किती निधी द्यायचा याचा पूर्ण अधिकार सरकारकडे असतो. आम्ही तिन्ही पक्ष भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी मिळून निधी वाटपाचा निर्णय घेतो. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात. 288 आमदारांच्या मागण्यांचा विचार करून आम्ही निधी वाटप करतो. शरद पवार यांनीही अनेक वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे, सरकार चालवलं आहे. त्यांनीही निवडणुकीच्या काळात घोषणांद्वारे निधीची घोषणा केली आणि निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे आता त्यांना याची आठवण होणं आश्चर्यकारक आहे, असे म्हणत टोला लगावला.
महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे
तसेच ते पुढे म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आम्ही योग्य निर्णय घेऊ, हे आम्ही आधीच सांगितले होते. गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकार करणार आहे. सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कोणीही वसुली करणार नाही’, असे स्पष्ट आदेश सरकारने दिले आहेत.
एका जागेवर एकच उमेदवार लढवू शकतो
एखाद्या छोट्या नगरपालिकेत झालेल्या युतीवरून शशिकांत शिंदे यांनी अतिरेकी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. काही ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला सोबत घेतलं जातं, काही ठिकाणी धनुष्यबाण आणि पंजा एकत्र दिसतात. याचा महायुतीशी काही संबंध नाही. आम्ही सतत सर्व नेत्यांच्या संपर्कात आहोत. कालही मी एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होतो. स्थानिक कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणुका लढवतात. एका जागेवर एकच उमेदवार लढवू शकतो. त्यामुळे काही ठिकाणी स्थानिक एकत्र येतात, याचा महाविकास आघाडीसोबत किंवा महायुतीचा काहीच संबंध नाही.
2029 पर्यंत लाडकी बहीण योजना लागू राहील
मध्यप्रदेशच्या धर्तीवर ‘लाडकी बहीण ’ सारखी योजना महाराष्ट्रात आणण्याच्या अनेक सूचना होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना लागू झाली. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत चर्चा केली होती. महायुतीतील अनेक नेत्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
हेदेखील वाचा : Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन






