Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीत आघाडीत दिसून आली बिघाडी; पण युती मात्र सुसाट...
नाशिकमध्ये शिवेसनेला महाविकास आघाडीने जागा दिली होती. तिथे ऐनवेळी सेना नेते मिर्लेकरांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की, “मतदार पुरेसे नाहीत म्हणून आम्ही अर्जच भरत नाही!” तसे तर सतरापैकी कोणत्याच मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार वा सेना उबाठा या तिन्ही पक्षांची एकत्रित मतेही जिंकण्यासाठी पुरेशी नव्हती व नाहीत. काही ठिकाणी ते लढायला उतरले पण ऐनवेळी माघारी पळाले. काही ठिकाणी लढतीत थांबले, पण जिंकण्याचे प्रयत्नही नाहीत. असे सारे का घडले असावे? याचे उत्तर मविआमध्ये समन्वयाचा अभाव हेच आहे. नेतृत्वाचाही गोंधळ हेही कारण आहेच.
राज्यातील २५ जिल्ह्यांतील सतरा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर जे राजकीय चित्र पुढे आले आहे ते महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची स्थिती दयनीय झाल्याचे दर्शवते. महायुतीकडे सर्व १७ ठिकाणी स्पष्ट बहुमत आहे. तरीही महाविकास आघाडीने निवडणुका लढवण्याचे ठरवले त्या मागे कोणतीही निवडणूक बिनविरोध होऊ नये, इतकाच हेतू असावा. सुरुवातीला महायुतीमधील पक्षांचेच तगडे उमेदवार मित्रपक्षांना आव्हान देत उभे राहिल्याने आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण, माघारीचे चित्र स्पष्ट होऊ लागताच त्यांचे धाबे दणाणले.
अखेरीस भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी या महायुतीमधील प्रत्येक पक्षाने दोन जागा बिनविरोध जिंकल्या. उर्वरीत ११ ठिकाणी होणाऱ्या लढतींतही महायुतीचेच पारडे जड आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार या तिघांनी मिळून महायुतीमधील काही ठिकाणी असणारे रुसवे फुगवे प्रयत्नपूर्वक संपवले. आणि नंतर ते काँग्रेस, सेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार या विरोधी पक्षांच्या उमेदवारांच्या मागे लागले. हे घडत असताना जे नाट्य कसे रंगले आणि महायुतीचे सारे नेते एकमेकांसाठी कसे झटले, याचे चित्र खरेतर विरोधकांना हादरवणारे होते.
बाळ माने हे ठाकरेंचे उमेदवार कोकणात लढत होते आणि त्यांची लढाई तटकरेंशी होती. पण, मानेंचा अर्ज मागे घेण्याची धडपड भाजपने केली. नीतेश राणे तिथे तळ ठोकून होते. शिवसेना शिंदे गटाचे रायगडचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या साईली ही तटकरेंना आव्हान देऊन उभी होती. तिचा अर्ज मागे घेण्यासाठी एकनाथ शिंदेंचे सहकारी उदय सामंत झटले. बाळ मानेंनी माघारीनंतर जे सांगितले, ते महाविकास आघाडीची सद्यस्थिती दर्शवणारे विदारक सत्य आहे. ते म्हणाले की, “सेना उबाठाचे ५५ सदस्य येथे मतदार आहेत. त्यांच्या जिवावर मी चार अर्ज दाखल केले होते. पण शरद पवार गट तसेच काँग्रेसकडून सूचक, अनुमोदक म्हणून मला एकही सही मिळत नव्हती. त्यांचे नगरसेवक, सदस्य भेटतही नव्हते. “तीर्थयात्रेला गेले” असे सांगण्यात येत होते! अशा स्थितीत मी कसे लढावे? ठाकरेंचे सहकारी विनायक राऊत हे तर शिंदेंच्या सेनेचे काम करतात की काय, असा संशय येतो!”
अहिल्यानगरमध्ये आणखी निराळाच ड्रामा रंगला होता. तिथे तनपुरे सोडून बाकी सारे अपक्ष उमेदवार रिंगणात होते. खरे तर महाविकास आघाडीच्या चर्चामध्ये ही जागा काँग्रेसला सुटली होती. श्रीरामपूरचे काँग्रेस नेते, नगराध्यक्ष करण ससाणे यांनी अपक्ष अर्जही दाखल करून ठेवला होता. पण, एकाही काँग्रेस नेत्याने त्यांना साधा फोनही केला नाही. तेव्हा मग कंटाळून त्यांनी अर्जच मागे घेऊन टाकला. नगरसारख्या मोठ्या व काँग्रेसची परंपरा राहिलेल्या जिल्ह्यात हे असे का व्हावे, हे कोडेच आहे. अपक्ष उमेदवार होते दत्तात्रेय पानसरे यांच्या अर्जावर एमआयएमच्या दोघा नगरसेवकांच्या सूचक, अनुमोदक सह्या होत्या. हे नगरसेवक जिल्हाधिकाऱ्यांकडे माघारीचा अर्ज घेऊन गेले आणि त्यासोबत पानसरेंचे पत्रही होते.
पण, माघारीची वेळ संपत असताना ऐनवेळी पानसरे स्वतः तिथे आले व म्हणाले की, दहा सूचक, अनुमोदक असताना दोघांच्या पत्रावर माझा अर्ज मागे का घेता? माझा अर्ज कायम ठेवा नाहीतर मी आत्मदहन करतो, असे म्हणून पानसरे व त्यांचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या देऊन बसले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्थिती चांगली हाताळली. गोंधळ शमवण्यासाठी पालकमंत्री विखे पाटीलही धावले. पानसरेंची समजूत घालण्यात आली. नंतर त्यांनी रात्री उशिरा अर्ज मागे घेतला. लातूर-बीड-धारशीव मतदारसंघात भाजपचे माजी काँग्रेसमंत्री बसवराज पाटील हे उमेदवार आहेत. ते जुने काँग्रेस नेते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे महेश देशमुख हे लढत देत आहेत. इथे सात अन्य अपक्ष होते. त्यांनी माघार घेतली.
नांदेडला अशोक चव्हाणांचे निकटवर्ती काँग्रेसचे माजी आमदार अमरनाथ राजुरकर लढत असून त्यांच्या विरोधात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील उभे होते. त्यांचा अर्ज अखेरच्या क्षणी परत घेतला गेला.
– अनिकेत जोशी






