खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मागील पाच दिवसांपासून अधिवेशन सुरु असून रोज नवीन वादामुळे अधिवेशन गाजते आहे. नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप आणि वादग्रस्त विधानांमुळे राजकारण सुरु आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब हे चर्चेमध्ये आले आहेत. अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत विधान केले आहे. मात्र यावेळी त्यांनी आणि संभाजी महाराजांसोबत तुलना केल्यामुळे सत्तधारी आक्रमक झाले आहेत. याबाबत आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
मुंबईमध्ये खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच अनिल परब यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर तोंडसुख घेतले. खासदार राऊत म्हणाले की, “ईडीवाले याच वास्तूमध्ये माझा छळ करत होते. इथूनच अटक करून मला तुरुंगात नेलं. अनिल परब यांना त्रास झाला. रवींद्र वायकर यांच्यावर पक्षांतर करा म्हणून दबाव टाकला होता. जे घाबरले नाहीत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाळगला ते शरण गेले नाहीत. जे नामर्द होते ते पळून गेले, त्यावर काय चर्चा करायची,” अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत यांनी मुंबईची भाषा मराठी नाही असे म्हणणाऱ्या आरएसएस कार्यकर्ते भैय्याजी जोशी यांच्यावर निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले की, “मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे आणि मुंबईवरचा मराठी ठसा पुसून टाकायचा आहे हे काही लपवून राहिलेलं नाही. मुंबईचे महत्व कमी करायचं आहे. मराठी माणसाची विभागणी करायची आहे. या सर्व गोष्टी करून झालेल्या आहे. मंगल प्रभात लोढा गुंड्यांचे बिल्डर हे भाजपचेच आहेत अशी अनेक नाव आहेत. हे भाजपचे अर्थ पुरवठादार आहेत,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मुंबईची भाषा मराठी नाही हे छातीठोकपणे सांगणं हा पुढच्या रणनीतीचा भाग आहे. इतर राज्यांमध्ये जाऊन हिंदी बोलू शकता का? भैय्याजी जोशी यांनी माफी मागायला हवी, विधानसभेत या संदर्भातील ठराव मंजूर करून घेतला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी थातूरमातूर उत्तर दिली, भैयाजी जोशी यांचा निषेध केला नाही. प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान केला तो का सापडत नाही त्याला अभय कोणी दिलं? त्याचा वावर हा देशाच्या गृहमंत्र्यांपासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आहे त्या चील्लरला तुमचंच अभय आहे. राहुल सोलापूरकर हा आरएसएसच्या कार्यालयात जाऊन बैठका घेतो. राहुल सोलापूरकरवर काय कार्यवाही केली सरकारने? त्याला अटक केली पाहिजे राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. सरकार मूग गिळून का बसला आहे तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून?” असे अनेक सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.