ठाकरे बॅन्ड आता संपलेला असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे (फोटो - सोशल मीडिया)
छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये दिशा सालियान प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. दिशा सालियान हिची आत्महत्या नसून हत्या झाली आहे. त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर दावा तिच्या वडिलांनी केला होता. या प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. यामुळे ठाकरे ब्रॅन्डवर टीका केली जात असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. यावर प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी ठाकरे ब्रँड आता संपलेला आहे, अशी टीका केली आहे. राजकीय वर्तुळामध्ये याची जोरदार चर्चा रंगली आहे.
शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विकासकामांचे उद्घाटन केले. याबाबत माहिती देताना संजय शिरसाट म्हणाले की, “आज विमानतळात तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण पार पडले. विशेष म्हणजे हा सर्व खर्च औद्योगिक संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी केला आहे. युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा अशा वातावरणात इथून माणूस बाहेर पडेल,” असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली होती. यांच्या या टीकेवर उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, “सत्तेत त्यांच्यासोबत युती असते त्यांच्या सोबत राहावं लागतं. तुमच्या सारखं नाही ज्यांच्या सोबत राहायचं नाही. त्यांच्यासोबत राहावं लागत आहे. तुम्हाला निकाह आवडत असेल तर तुम्ही तिकडे संसार करा, आमचा संसार चांगला चालू आहे. हे काय पिसाळलेले कुत्रे आहेत नेहमी भुकत असतात. आम्ही जमलं तर त्यांचाही दूध काढू फक्त वेळ येऊ द्या,” अशी घणाघाती टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय शिरसाट यांनी ठाकरे नावाचा ब्रँडवर प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट म्हणाले की, “ठाकरे ब्रँड हा संपलेला आहे. बाळासाहेबांचे शिवसेना आणि विचार जिवंत आहेत. ठाकरे गट केव्हाच संपलेला आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि पुढे घेऊन जात आहोत, असे म्हणत शिरसाट यांनी ठाकरेंना डिवचले आहे. त्याचबरोबर येत्या 30 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर येणार आहे. मात्र नागपूरमध्ये नुकतीच दंगल झाली. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, नागपूरची घटना सुनियोजित होती. पेट्रोल-बॉम्ब असेल, दगड असेल, हत्यार असेल ही सर्व एका तासांमध्ये तिथे जमा झाली होती,” असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले की, “एकनाथ शिंदेंची लोक बाळासाहेबांचा फोटो वापरतात. जर बाळासाहेब आता हयात असते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना मातोश्रीच्या बाहेर चाबकाने फोडलं असतं. दिशा सालियान हिच्या वडिलांना हाताशी धरुन राजकारण करत आहेत ते त्यांना लखलाभ होवो. अशा घाणेरड्या विषयांचं राजकारण करुन जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करु इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात. आम्ही बाळासाहेबांचे विचारवाहक असल्याचे म्हणतात. अशा खाणेरड्या प्रकरणाचं राजकारण करताना त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला होता.