शरद पवार आज नाशिकमध्ये; सुप्रिया सुळेंसह रोहित पवारही येणार, आगामी निवडणुकांबाबत...
नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय शिबिर रविवारी (दि. १४) नाशिक येथे होत आहे. या एक दिवसीय शिबिराला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार असून, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
एकदिवसीय शिबिरासाठी शरद पवार यांचे रात्री उशीरा नाशिकमध्ये आगमन झाले असून, सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शरद पवार गटाच्या या शिबीराकडे पाहिले जात आहे. या शिबिरात राजकीय स्थितीबरोबरच सरकारच्या कामगिरीची चिरफाड होणार आहे. त्यासाठी विविध विषयांवर पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.
तसेच याच शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणकीसाठी पक्षाची भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी दहा वाजता पंचवटीतील स्वामी नारायण मंदिराच्या सभागृहात या शिबीराचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येईल व समारोपाला ते मार्गदर्शन करतील.
सोमवारच्या मोर्चात सहभागी होणार
शहरात आगमन या शिबीरासाठी उपस्थित राहण्यासाठी शरद पवार यांचे शनिवारी रात्री उशीरा झाले. तत्पूर्वी सायंकाळी सहा वाजता दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी या कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जन्मगावी उभारण्यात आलेल्या स्मारकाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पहिलाच मोर्चा
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यातील पहिलाच मोर्चा पक्षाच्यावतीने नाशिकमध्ये काढण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी बारा वाजता गोल्फ कल्ब मैदानापासून या मोर्चाला सुरूवात होईल, त्यात पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. मोर्च जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर शरद पवार मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करतील अशी माहिती आता देण्यात आली.