महादरे आणि हत्ती तलाव परिसराचा विकास कामांची शिवेंद्रराजे भोसले पाहणी केली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Satara News : शाहूपुरी : शहरालगतच्या महादरे आणि हत्ती तलाव परिसराचा विकास आता नव्या टप्प्यात प्रवेश करत असून, सुमारे ६ कोटी रुपयांच्या आराखड्याला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर, पाणीपुरवठा सभापती धनंजय जांभळे, भाजप गटनेते अविनाश कदम, नगरसेविका मुक्ता लेवे आणि मुख्याधिकारी विनोद जळक उपस्थित होते.
या प्रकल्पाचा केंद्रबिंदू म्हणजे महादरे व हत्ती तलावांची पाणी साठवण क्षमता वाढवणे, परिसराचे सुशोभीकरण करणे आणि त्याला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणे. सुमारे २८ एकर नगरपालिका मालकीच्या जागेवर आधुनिक बाग उभारण्याची संकल्पनाही यावेळी पुढे आली. संपूर्ण प्रकल्प तीन टप्प्यांत राबवला जाणार आहे.
हे देखील वाचा : “मविआचा कार्यकर्ता वहिनींसोबत ताकदीनं उभा..; सुप्रिया सुळेंचे सांगता सभेत आश्वासन
पहिल्या टप्प्यात तलावांचे सुशोभीकरण, दोन्ही तलावांना जोडणाऱ्या ऐतिहासिक संरचनेची दुरुस्ती व बळकटीकरण, पाणी शुद्धीकरण यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि परिसरातील दळणवळण सुविधा सुधारण्यावर भर असेल, अशी माहिती भोसले यांनी दिली. प्रस्तावित रिंग रोडमुळे कास पठारावरून येणाऱ्या पर्यटकांना या परिसरात थेट प्रवेश मिळणार असून, जवळील फुलपाखरू अभयारण्यालाही याचा फायदा होणार आहे.
नागरिकांसाठी विरंगुळ्याचे केंद्र म्हणून प्रशस्त बाग विकसित केली जाणार असून, त्यात बसण्यासाठी बाके, पॅगोडा, ‘नाना-नानी पार्क’ आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा समावेश असेल. वृक्षारोपणासाठी नगरपालिका आणि वनविभागाच्या माध्यमातून नियोजन करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा : महिला आरक्षण विधेयकावरून हिंगोली तापले! काँग्रेसविरोधात शिंदे गटाची जोरदार घोषणाबाजी
दरम्यान, अलीकडील राजकीय घडामोडींवर बोलताना भोसले यांनी महायुतीतील समन्वयावर भर दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील समीकरणे वेगळी असली तरी जिल्हा परिषदेत सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महेश शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले, मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष प्रियाताई शिंदे यांच्या उमेदवारीसाठी भाजपने पुढाकार घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
साताऱ्यात सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप
सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत, अंशकालीन, कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी २० एप्रिल २०२६ पासून अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे.
जिल्हा संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, शासनाकडून वारंवार लक्ष वेधूनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संपाचा पर्याय स्वीकारण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
संपाच्या काळात दररोज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचारी एकत्र येऊन निदर्शने करणार आहेत. या आंदोलनाचा परिणाम शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






