भाजपची शिवा संघटनेवर राजकीय ताकद म्हणून बसवेश्वर जयंती साजरी केली (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने नांदेड शहरातील कौठा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भव्या कार्यक्रमाने सामाजिक एकात्मतेचा संदेशा दिला असला, तरी त्यामागे नव्या राजकीया समीकरणांची साखर पेरणी सुरू झाल्याची चर्चा राजकीय (Political News) वर्तुळात रंगू लागली आहे. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात शिवा संघटनेची राजकीय ताकद लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना बरोबर घेऊन यावर्षीची बसवेश्वर जयंती साजरी केल्यामुळे राजकीय निरीक्षकाच्या भुवया उंचावल्या आहेत.
बसवेश्वर जयंतीच्या कार्यक्रमात विविध पक्षांतील नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक प्रभावी चेहरे एकत्र दिसल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा केवळ जयंती उत्सव नसून शक्तीप्रदर्शनाचा मंच ठरल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : “दादा खरंच गेलाय का…? तो शेवटचा फोन अन् भेट; MP सुप्रिया सुळेंनी मांडल्या भावना
नेत्यांचा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
विशेषतः भारतीय जनता पक्षातील एका गटाने शिवा संघटनेला बरोबर घेतल्याचे या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आले. स्थानिक स्तरावर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जाणकारांचे मत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामीण भागातील सत्तासमीकरणे लक्षात घेता ही जवळीक भविष्यातील राजकीय आघाडीची नांदी ठरू शकते, अशी चर्चा आहे. या कार्यक्रमातील आणखी एक बाब राजकीय चर्चेचा विषय ठरली.
नव्या राजकीय प्रयोगाची वर्तविली जातेय शक्यता
भारतीय जनता पक्षाच्या महानगराध्यक्षांच्या नावाने शहरात लावण्यात आलेल्या बॅनर्सवर खासदार अशोक चव्हाण यांच्या समवेत काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण व शिवा संघटनेचे प्रमुख मनोहर धोडे सराचे फोटो झळकल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये लिंगायत नेतृत्व सक्रिय असताना शिवा संघटनेला बरोबर घेऊन मोठ्या प्रमाणावर बसवेश्वर जयंती साजरा करण्या पाठीमागे नक्कीच काहीतरी राजकीय प्रयोग असल्याचे वर्तविले जात आहे. विरोधी विचारसरणीच्या नेत्यांचे फोटो एकाच बॅनरवर झळकणे हा केवळ औपचारिक सन्मान आहे की त्यामागे व्यापक राजकीय संदेश दडलेला आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
हे देखील वाचा : “संसदेत असलेल्या लोकांपेक्षा यांची अक्कल जास्त आहे का? संजय राऊतांनी काढले सत्ताधारी नेत्यांचे वाभाडे
नांदेड जिल्हयातील राजकारणात समाजनिहाय मतांचे गणित महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे बसवेश्वर जयंतीसारख्या सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध समाजघटकांशी संपर्क वाढवत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न अनेक गटांकडून होत असल्याचे दिसते, विशेषतः लिंगायत समाजातील नेतृत्व कोणाच्या बाजूने झुकते, यावर अनेकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. दरम्यान, आगामी विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही इच्छुकांनी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजी, सामाजिक समीकरणे आणि संघटनात्मक बळ याचा मेळ घालून मोठे राजकीय चित्र उभे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. एकंदरित, महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने नांदेडमध्ये केवळ सांस्कृतिक उत्सव नव्हे, – तर भविष्यातील राजकीय आघाड्यांचे संकेत दिसून आले असून येत्या काळात जिल्ह्यात नवे समीकरण उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






