नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यावरुन खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
नाशिक : नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. त्याचबरोबर लवकरच सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यामुळे राजकीय मांदियाळी देखील नाशिकमध्ये जमत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यायलामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये 13 आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृत स्नानाची तारीख जाहीर केली आहे. यावरुन आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधून अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन नाशिकमध्ये कुंभमेळा बैठक घेतात. पण नाशिकची काय परिस्थिती झाली आहे ते बघा एकदा. शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, रस्ते पाण्याने तुंबत आहेत. तुम्ही नाशिक दत्तक घेतले होते. पण नाशिकचे अनाथ आश्रम केलंय तुम्ही. कुंभ साठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले. पण किती हजार कोटी रुपयांचे प्रत्यक्षात काम होणार आहे?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यावरुन नाशिकच्या कुंभमेळ्यातील घोटाळ्याबाबत संशय उपस्थित केला. ते म्हणाले की, “सरकारची पैशांची कशा प्रकारे लूट होत आहे तुम्ही प्रयगराज मध्ये पाहिले आहे. प्रयागराज मध्ये सगळे टेंडर गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आले. नाशिक मध्ये सुद्धा काही वेगळे होईल असं मला वाटत नाही,” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पालकमंत्री काय दिवे लावतात?
नाशिक पालकमंत्री पदाचा मुद्दा देखील चर्चेत आहे. भाजप नेते गिरीश महाजन तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. छगन भुजबळ यांना देखील मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाची लढाई आता तिहेरी झाली आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, “मंत्री कामच करत नाही, बाकीच्या ठिकाणचे पालकमंत्री काय दिवे लावत आहेत तुम्ही पाहा. अलीकडे लुटण्यासाठी पालकामंत्र्यांची नेमणूक होते,” अशी टीका खासदार राऊत यांनी केली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्देश दिल्यानंतर जोरदार तयारी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून नेत्यांचे दौरे सुरु झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार राऊत हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. याबाबत माहिती देताना खासदार राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात 27 महापालिका निवडणुका लवकर होणार आहेत. सध्या लूट सुरू आहे, महापालिका लुटले जात आहेत. 3 वर्षांपासून निवडणुका तुम्ही घेत नाही ही कसली लोकशाही? न्यायालयाने खडेबोल सुनावले म्हणून तुम्ही तयारी करत आहेत,” असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.