'विश्वगुरू झुरळांना घाबरतात'; दिल्लीतील आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा मोदी सरकारवर घणाघात
राजधानी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली संसदेकडे मोर्चा काढण्यात आला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, “भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश असल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत आंदोलकांच्या मागण्यांवर संवाद साधण्याऐवजी आंदोलन मोडून काढण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे.” सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवण्यासाठी वापरण्यात आलेल्या पांढऱ्या चादरींचा उल्लेख करत त्यांनी, “पांढऱ्या चादरी शेवटच्या क्षणी वापरल्या जातात. लोकशाहीचाच शेवट करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप केला.
केंद्र सरकारवर टीका करताना अंधारे म्हणाल्या की, पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला देणारे सत्ताधारी आपल्या देशातील नागरिकांशी संवाद साधण्यास तयार नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी हा वेगळा मुद्दा असला, तरी सरकार चर्चेलाही तयार नसल्याचे त्यांनी म्हटले. “याचा अर्थ विश्वगुरू झुरळांना घाबरतात,” अशी उपरोधिक टीका करत त्यांनी लोकशाही धोक्यात असल्याचा दावा केला.
सुषमा अंधारेंनी स्पष्ट केले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आंदोलनाशी सातत्याने संपर्कात आहेत. अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि आंदोलनातील अन्य सहभागींसोबत पक्षाचे नेते नियमित चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनाला पक्षाचा पूर्ण पाठिंबा कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले.
‘अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय बापाची जाहगीर वाटली काय ?’; रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर घणाघात
दिल्लीतील आंदोलनामुळे केंद्र सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत असून, येत्या काही दिवसांत या आंदोलनाचे राजकीय पडसाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






