"ब्रिटिश राजवटीप्रमाणे विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न," प्रकाश आंबेडकरांचा घणाघात(संग्रहित फोटो)
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या CJP (कॉकरोच जनता पार्टी) च्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलनकर्त्यांनी जंतर-मंतरवरून संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संसद परिसरातील सुरक्षा लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. आरपीएफचे जवान आणि पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.यावरून आता देशभरातून मोठ्या प्रतिक्रिया येत असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला धारेवर धरत आपल्या ‘x’ अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जबाबत मोठे भाष्य करत भाजप सरकारची तुलना ब्रिटिश राजवटीसोबत केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले की, जबाबदारीची मागणी करणे, संवाद साधण्याची अपेक्षा व्यक्त करणे आणि शांततापूर्ण आंदोलन करणे ही सुदृढ लोकशाहीची ओळख आहे. मात्र, अशा आंदोलनांना बळाचा वापर करून दडपले जात असेल आणि असहमतीचा आवाज दाबला जात असेल, तर ते हुकूमशाहीच्या प्रवृत्तीचे लक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला.
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरील कारवाई, मध्य प्रदेशातील केन-बेतवा नदी प्रकल्पग्रस्त आदिवासींचे आंदोलन आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा उल्लेख करत त्यांनी या घटनांमधून विरोधी आवाज दाबण्याची प्रवृत्ती दिसून येत असल्याचे म्हटले.
Seeking accountability, encouraging dialogue, and peaceful protests are hallmarks of a healthy democracy. But when peaceful protesters, seeking accountability are met with force and dissent is suppressed, it signals authoritarianism. Whether it is the forcible removal of Sonam… pic.twitter.com/olrNpYDWZG — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 20, 2026
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये २५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासभेत केलेल्या भाषणाचा उल्लेख केला. लोकशाहीत सामाजिक आणि राजकीय बदलांसाठी घटनात्मक मार्गांचा अवलंब करण्यावर बाबासाहेबांनी भर दिला होता, असे त्यांनी नमूद केले.
तसेच, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांशिवाय लोकशाही टिकू शकत नाही. सत्तेला प्रश्न विचारणे, जबाबदारीची मागणी करणे आणि शांततापूर्ण मार्गाने असहमती व्यक्त करणे हे लोकशाहीच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर टीका केली. “ब्रिटिश राजवटीप्रमाणे विरोधी आवाज आणि असहमती दडपण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे,” असा आरोप त्यांनी केला.
त्यांच्या मते, इतिहासाने अनेकदा दाखवून दिले आहे की प्रश्न दडपून टाकल्याने सत्ता अधिक मजबूत होत नाही. उलट लोकांचा असंतोष वाढतो आणि लोकशाहीत हुकूमशाही पद्धती रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाच त्याची राजकीय किंमत मोजावी लागते.
प्रकाश आंबेडकरांच्या या विधानामुळे दिल्लीतील आंदोलन आणि त्यावरील पोलिस कारवाईचा मुद्दा आता आणखी राजकीय चर्चेचा विषय बनण्याची चिन्हे दिसत आहेत.






