ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसैनिकांना पत्र लिहिले आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई :आज शिवसेना पक्षाचा 59 वा वर्धापन दिन आहे. मुंबईमध्ये दोन शिवसेनेचे दोन स्वतंत्र मेळावे होत आहेत. शिंदे गटाचा वरळीमध्ये तर ठाकरे गटाचा षण्मुखानंद हॉल येथे वर्धापन दिन मेळावा होणार आहे. दोन्ही नेते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे काय भूमिका स्पष्ट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून कोणती भूमिका घेतली जाणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना खुले पत्र लिहिले आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर हे पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, शिवसैनिकांना खुले पत्र सर्वप्रथम शिवसैनिकांना आजच्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ज्या ज्ञात अज्ञातांनी ‘शिवसेना’ या चार अक्षरांना धर्म मानून महाराष्ट्राची सेवा केली, करत आहेत त्या सर्वांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राचे राजकारण आज गढूळ झाले आहे. निष्ठेला विकत घेण्यासाठी अमिषाचे अक्षरशः बाजार भरवले जात आहेत. या परिस्थितीतही स्थिर राहायचे असेल तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला एक मंत्र जपलायला हवा. तो म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण. या मंत्राचा शिवसैनिकांशिवाय सर्वांना विसर पडला आहे. आपल्यातून गेलेल्या गद्दारांचा या मंत्राशी तर काडीचाही संबंध नाही. आपण छातीठोकपणे सांगू शकतो की होय.. बाळासाहेब ठाकरे आमच्या संघटनेचा बाप आहे. गद्दार गटाने हे हे शब्द उच्चारले तर दिल्लीतील शाह डोळे वटारतात. चतकोरीच्या बदल्यात खाल्ल्या मिठाला न जागणाऱ्या या गद्दारांना सूर्याजी पिसाळ म्हणावे, खंडोजी खोपडे म्हणावे की अजून काही, हे काळ ठरवेल..
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आपली बांधिलकी जनतेशी आणि ‘मातोश्री’शी आहे. हो तीच मातोश्री जिथे भले-भले लोक डोकं टेकवायला आले आहेत. तेच मातोश्री ज्यात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाची दिशा बदलण्याचा जिगर आहे. आज शेतकरी, सामान्य माणूस, महिला आणि अगदी लहान लेकरांचे भविष्य या सरकारने अधांतरी लटकवून ठेवले आहे. भोवताली हजार प्रश्न आहेत ज्यांच्यावर आपल्याला लढण्याचे बळ मिळत राहील. १९६६ साली स्थापन झालेल्या शिवसेनेला सत्तेपर्यंत पोहचायला १९९५ उजाडले होते. आपल्याला जनतेचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी निश्चितच इतका काळ वाट बघावी लागणार नाही. फक्त हे प्रश्न हाती घेऊ, आंदोलनांचे रान उठवू आणि लोकांचे प्रश्न धसास लावू. सत्ताधारी शिवसेनेपुढे नाही झुकणार तर कोणापुढे झुकणार मग!
मला आज एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आपल्या वर्धापन दिनाच्या एक दिवस अगोदर, म्हणजे १८ जून १९८३ रोजी हिंदुस्थान-झिम्बाब्वे हा सामना इंग्लंडच्या टनब्रिज मैदानावर झाला होता. हिंदुस्थानी टीमच्या १७ धावांवर ४ विकेट गेलेल्या असताना कर्णधार कपिल देव खेळण्यासाठी आले. बॅटिंग ऑर्डरचा पूर्ण बोऱ्या वाजलेला असताना हा सामना हिंदुस्थान जिंकेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण कपिल देव यांनी धुवाधार खेळ करत संघाची धावसंख्या २६६ या सन्मानजनक आकड्यापर्यंत नेली. कपिल स्वतःवर विश्वास ठेवून खेळले. केवळ सामना आपल्या टीमला जिंकूनच नाही दिला तर १३८ चेंडूत १७५ धावांचा नवा विश्वविक्रम करून दाखवत मैदानावर आपला दरारा कायम केला. एवढ्यावर न थांबता कोणालाही विश्वास नसताना आपल्या टीमने महाकाय वेस्टइंडिजची सद्दी मोडत विश्वविजेतेपदाला गवसणी घाण्याचा अविश्वसनीय पराक्रम त्यांच्याच नेतृत्वात केला होता.
शिवसैनिकांना खुले पत्र
सर्वप्रथम शिवसैनिकांना आजच्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ज्या ज्ञात अज्ञातांनी ‘शिवसेना’ या चार अक्षरांना धर्म मानून महाराष्ट्राची सेवा केली, करत आहेत त्या सर्वांना विनम्र अभिवादन.
महाराष्ट्राचे राजकारण आज गढूळ झाले आहे. निष्ठेला विकत घेण्यासाठी… pic.twitter.com/4vRprwSL3f
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 18, 2025
आज मी तुमच्या प्रत्येकांत स्वतःवर विश्वास असणारा असा एक कर्णधार कपिल देव पाहतो. फरक एवढाच आहे की ते क्रिकेटच्या मैदानावर खेळले, आपण राजकीय पटलावर आहोत. आपला दरारा ही आपली ताकद आहे. तो तसूभरही कमी होता कामा नाही. गल्ली ते दिल्ली तो असलाच पाहिजे! सत्ता आपोआप आपल्या मागे फरफटत येईल.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सरकार राज्याचे असो वा केंद्राचे.. जनतेच्या मुद्द्यांवर सरकारला घाम फोडून आपल्याला आपला दरारा कायम ठेवायचा आहे. आपल्याकडे अनेक पराक्रम करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचा एक आदर्श कर्णधार आहे. त्यांचा दरारा उभ्या जगाने पाहिला आहे. आपण त्यांचे बछडे आहोत, आपल्याला कोणाचे कसले भय? आपल्या मुळावर उठणाऱ्या प्रत्येकाचा हिशेब आपल्यालाच करावा लागणार आहे. अगदी आपल्यातून गेलेल्या कृतघ्न लोकांचाही! आज ठाकरे पिता-पुत्र पाय रोवून उभे आहेत. त्यांना मजबुती द्यायची हे आपले कर्तव्य आहे. कोणत्याही क्षणिक मोहाला बळी न पडता आपण ते यशस्वीपणे बजावूच. परत लढू, परत जिंकू! असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे.