ठाणे महानगर पालिकेमध्ये मराठीमध्ये शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्याबाबत निर्णय घेतल्याने राजकारणी आक्रमक (फोटो - सोशल मीडिया)
ठाणे : राज्यभरामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीमध्ये अखिल मराठी साहित्य संमेलन पार पडले आहे. तर माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील मिळाल आहे. मात्र राज्यामध्येच मराठी भाषेची अवहेलना होणे काही थांबत नाही. ठाणे महानगरपालिकेच्या अजब निर्णयामुळे मराठी भाषेची महाराष्ट्रामध्ये गळचेपी होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाली आहे.
ठाणे महानगरपालिकेने एक परिपत्रक जाहीर केले आहे. या जाहीर केलेल्या एका परिपत्रकानुसार, एमए (मराठी) आणि तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सातव्या वेतन आयोगामध्ये शिक्षणावर आधारीत अतिरिक्त वेतनवाढी देय असण्याबाबत शासन निर्देश अजून मिळालेले नाहीत. यामुळे डीएमजीएफएम, एलएसजीडी, एमए(मराठी) व तत्सम अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाऱ्या अतिरिक्त वेतनवाढीबाबत प्रशासनाने अंतिम निर्णय आवश्यक असल्याचे निरिक्षण मुख्य लेखा परिक्ष यांनी नोंदविले होते. या निरिक्षणाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आल्याने आता यापुढे अशा प्रकारचे शिक्षण घेणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मराठीमध्ये शिक्षण घेणाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाणे पालिकेच्या या कारभारावर जोरदार ताशेऱे ओढले आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, मंत्रालयाचा कारभार मराठीतून झाला पाहिजे. या राज्यामध्ये मराठी भाषा विभागाच स्वतःच मंत्रालय आहे. देशाच्या राजधानीत मराठी साहित्य संमेलन भरवलं जातं. त्या संमेलनात मुख्यमंत्री, मोदीजी येतात आणि मराठीचा जयजयकार करतात. जे ठाणे शहर मराठीची पंढरी होती आणि साहित्यिक मोठे झाले, त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये त्या ठाण्यात मराठी पदवीधरांना वेतन वाढ नाकारली जात असेल तर या राज्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाहक आम्हीच आहोत असे दाढीवाले जे सांगत आहेत त्या दाढीवाल्यांना प्रश्न विचारला पाहिजे. हा मराठी वरचा बलात्कार आहे” अशा गंभीर शब्दांत खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ठाणे महानगर पालिकेच्या या निर्णयाविरोधात मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलन करत ठाणे महानगर पालिकेमध्ये घोषणबाजी देखील केली. याचबरोबर अविनाश जाधव यांनी अतिरिक्त आयुक्तांची भेट देखील घेतली आहे. याबाबत मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, मराठीतून एमए करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देणार नाही असं ठाणे महापालिकेने जीआर काढला, मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यात मराठीतून शिक्षण घेतले म्हणून वेतनवाढ होणार नसेल तर यापुढे असं शिक्षण कोण घेईल? ज्योची पुढे शिकायची असेल तर तो एमए कसा होईल. याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली असून संच्याकाळपर्यंत यावर निर्णय घेऊन जीआर रद्द करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे.