राज्यात लवकरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (फोटो- istockphoto)
राज्यात लवकरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
मावळ तालुक्यात होणार रंगतदायर निवडणूक
सुप्रीम कोर्टाने दिले निवडणुका घेण्याचे आदेश
वडगाव मावळ: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षांपुरती मर्यादित असलेली राजकीय चर्चा आता अधिक व्यापक झाली असून मावळ तालुक्यातील पाच प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी हे पाच पक्ष एकत्र येऊन ‘महाविकासआघाडी’च्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
या संदर्भात २७ ऑक्टोबर रोजी तळेगाव दाभाडे येथे महाविकासआघाडीच्या घटक पक्षांच्या तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे दत्तात्रय पडवळ, शिवसेना (उबाठा) चे आशिष ठोंबरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अशोक कुटे, आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते.या पाचही पक्षांच्या प्रतिनिधींनी संयुक्तरीत्या जाहीर केले की, मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, तळेगाव दाभाडे आणि लोणावळा नगरपरिषद तसेच वडगाव मावळ नगरपंचायतीच्या निवडणुका महाविकासआघाडीच्या बॅनरखाली लढवल्या जाणार आहेत.
विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येऊन लढणार
पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले की, “लोकशाही टिकवण्यासाठी सशक्त विरोधकांची गरज आहे. मावळ तालुक्यात जनतेच्या प्रश्नांवर आणि विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येऊन आम्ही निवडणुका लढवू. मतदारांना पर्याय देणे ही काळाची गरज आहे.”पुढे त्यांनी म्हटले की, “आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, परंतु जनतेच्या हितासाठी एकविचाराने लढण्याचा निर्धार केला आहे. योग्य ठिकाणी सन्मानपूर्वक वाटाघाटी झाल्यास बिनविरोध निवडणुकीलाही आम्ही पाठिंबा देऊ शकतो.
Dhule News: धुळ्यात काँग्रेसच्या गडाला खिंडार; माजी सभापतींसह शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात
मावळ तालुक्यात येत्या काही महिन्यांत पंचायत समिती, जिल्हा परिषद, तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि वडगाव मावळ नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे, तर दुसरीकडे महाविकासआघाडीचे पाच घटक पक्ष एकत्र येऊन संयुक्त रणनिती आखत आहेत.आगामी काही दिवसांत या आघाडीचा संयुक्त जाहीरनामा, प्रचार समिती आणि उमेदवार निवड प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडीच्या या नव्या घडामोडीमुळे मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच रंगतदार बनले आहे.






