राज्यात लवकरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (फोटो- istockphoto)
वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू
10 नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्यास प्रारंभ होणार
उमेदवारी जाहीर न झाल्याने राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण
वडगाव मावळ: वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, मतदान 2 डिसेंबर रोजी होणार आहे. तर सोमवार, 10 नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असतानाही, प्रमुख राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारी जाहीर न झाल्याने राजकीय वर्तुळात आणि वडगाव मावळमधील मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
नगरपंचायतीची मुदत जानेवारी 2023 मध्ये संपल्यानंतर प्रशासकाच्या माध्यमातून कामकाज सुरू होते. या पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक सत्तांतर ठरण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. एकूण 17 प्रभागांमधून 17 नगरसेवक आणि एक थेट नगराध्यक्ष अशी निवडणूक होणार आहे.
सर्वसाधारण महिला राखीव – नगराध्यक्षपदासाठी संभाव्य उमेदवारांमध्ये चुरस
नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून अबोली मयूर ढोरे यांनी आधीच जनसंपर्क मोहीम सुरू केली असून, महिला वर्गातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर भाजपकडून माजी सभापती गुलाब म्हाळसकर यांच्या कन्या अँड मृणाल म्हाळसकर यांनीही प्रचाराची दिशा घेतली आहे. त्यांच्या प्रत्येक प्रभागात गाठीभेटी,आणि महिलांशी संवाद या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जात आहे. मात्र दोन्ही पक्षांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नसल्याने स्थानिक स्तरावर “कोणावर विश्वास ठेवावा?” असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित झाला आहे.
उमेदवारीवरून चुरस – अपक्षाचा पर्यायही चर्चेत
दोन्ही प्रमुख पक्षांकडे नगरसेवक पदांसह नगराध्यक्ष पदासाठीही इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षांतील गटबाजी वाढल्याची चर्चा आहे.
यामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी कोणाला मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार का? किंवा पर्यायी म्हणून दुसऱ्या पक्षाकडून मैदानात उतरणार का? — अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
मावळची निवडणूक भाजप, राष्ट्रवादीसाठी अवघड? ‘हे’ पाच प्रमुख पक्ष आले एकत्रित; हालचालींना आलावेग
नागरिकांमध्ये उत्सुकता – “कोण उभा राहतोय?” या चर्चांनी रंग घेतला
नगरपंचायतीच्या निवडणुकीत नागरिकांचा सहभाग हा नेहमीच मोठा असतो. यंदा मात्र “कोण उमेदवार म्हणून समोर येणार?” याबद्दल मोठी उत्सुकता आहे. बाजारपेठ, चौक, चहाचे टपरी, सोशल मीडिया सर्वत्र फक्त एकच चर्चा –“कोण होणार वडगावचा पुढचा नगराध्यक्ष?” नागरिकांचे म्हणणे आहे की, विकासकामांना गती देणारा, तरुण आणि सक्षम नेतृत्व हवे. मागील कार्यकाळातील अपूर्ण कामे, रस्ते-विज-पाणी यासारख्या मूलभूत सुविधांबाबतही मतदारांचा असंतोष दिसतोय. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांचा कल व्यक्तीपेक्षा कामगिरीकडे झुकू शकतो, असे निरीक्षकांचे मत आहे.
बहुरंगी निवडणुकीचे संकेत – अपक्ष उमेदवारही मैदानात उतरण्याची शक्यता
भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रमुख पक्षांसह, काही अपक्ष आणि स्थानिक गट देखील मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत.
गेल्या निवडणुकीत थोडक्यात पराभव झालेल्या काही इच्छुकांनी यंदा पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे वडगावची निवडणूक बहुरंगी, चुरशीची आणि रोमांचक होण्याची चिन्हे आहेत.
“रविवारी चित्र स्पष्ट होईल” – दोन्ही पक्षांचे संकेत
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून रविवारी उमेदवारांबाबत अंतिम निर्णय जाहीर होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष रविवारी होणाऱ्या या बैठकीकडे लागले आहे.






