कोल्हापूर जिल्हा परिषदेवर पुन्हा महिलाराज? आरक्षणाचे चित्र स्पष्ट, अनेक ठिकाणी इच्छुकांची गोची (फोटो - iStock)
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षणाच्या घोषणेनंतर तालुकानिहाय गट आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यंदाही महिलांचा दबदबा स्पष्टपणे जाणवतो आहे. अनेक तालुक्यांमध्ये गटांवर महिला आरक्षण लागू झाल्याने आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा ‘महिलाराज ‘ होण्याची चिन्हं दिसत आहेत.
सर्वात जास्त लक्षवेधी बाब म्हणजे चंदगड तालुक्यातील परिस्थिती. या तालुक्यातील एकूण चारही गटांवर महिला आरक्षण लागू झाले आहे. त्यापैकी दोन गट खुले (महिला) तर उर्वरित दोन गट इतर प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या तालुक्यातून केवळ महिला उमेदवारच जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरणार आहेत. याचबरोबर भुदरगड तालुक्यातही महिला आरक्षणाचा प्रभाव जाणवतो आहे. येथे चार गटांपैकी तीन गट खुले (महिला) असून एक गट ओबीसी (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. यामुळे या तालुक्यातही सर्वच गट महिला उमेदवारांसाठी खुले राहणार आहेत.
हेदेखील वाचा : Pune Zilla Parishad Reservation: पुणे जिल्हा परिषदेच्या गटांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर
दरम्यान, या दोन तालुक्यांपुरतेच नव्हे तर जिल्हाभरात आरक्षणाचा कल महिलांकडे झुकलेला दिसतो आहे. अनेक ठिकाणी खुल्या, ओबीसी, तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात महिला आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेत महिलांचा प्रभावी सहभाग वाढण्याची शक्यता आहे.
विद्यमान सदस्यांचे गट आरक्षण बदलले
राजकीय पातळीवर या आरक्षणामुळे सर्वच पक्षांनी आता महिला नेतृत्वावर अधिक भर देण्याची गरज भासणार आहे. अनेक ठिकाणी पुरुष इच्छुकांना मागे हटावे लागणार असून महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे. काही ठिकाणी विद्यमान सदस्यांचे गट आरक्षण बदलल्याने समीकरणेही बदलली आहेत.
आरक्षणामुळे वाढला महिलांचा सहभाग
गेल्या काही निवडणुकांकडे पाहता महिला आरक्षणामुळे महिलांचा सहभाग सातत्याने वाढला आहे. यावर्षीही त्याच दिशेने वाटचाल होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ‘महिलाराज’ होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.