झिशान सिद्दीकी यांची आमदारकी धोक्यात?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून गोंधळाची परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झिशान सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर आणि सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वाक्षरी आहे. परंतु, २९ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयॊगाला पाठवलेल्या पत्रात पक्षाची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या नव्या कार्यकारणीत सुनील तटकरे यांच्या नावाचा आणि पदाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. पत्र पाठ्वल्याच्या दुसर्या दिवशी म्हणजेच ३० एप्रिल रोजी झिशान सिद्दीकी यांनी आपला एबी फॉर्म जमा केला. त्यावर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून सही होती. त्यामुळे मोठी तांत्रिक विसंगती निर्माण झाली. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात तटकरे यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख नसणे आणि एबी फॉर्म वर प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंची सही असणे यामुळे मोठा गोंधळ उडाला असून झिशान सिद्दिकींची आमदारकी धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत.
राष्ट्रवादीत अंतर्गत कलह, पार्थ पवारांनी घेतली फडणवीसांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याने या नाराजीनाट्याला सुरुवात झाली. यानंतर पक्षाकडून याबाबत स्पष्टीकरण देत निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणी यादीत नसणे हि प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाला नव्या कार्यकारिणी यादीबाबत लवकरच पत्र पाठवले जाईल असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही हि खरंच एक प्रिंटिंग मिस्टेक होती कि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेला अप्रत्यक्ष संदेश होता याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी पक्षातील नाराजीनाट्यावरून अद्याप काही प्रतिक्रिया दिली नसली तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार पटेल आणि तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ले चढवत आहेत. “अजित पवार यांनी शेवटच्या चार महिन्यांत माझ्याशी बोलताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे राष्ट्रवादीतील २२ आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला होता.






