चंद्रपूरचा महापौर काँग्रेसचाच होणारः (संग्रहित फोटो)
नागपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचा अधिकृत गट रीतसर आणि सर्व नियमांचे पालन करून स्थापन करण्यात आला आहे. गटनेतेपदाबाबतचा अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्षांनीच घेतलेला आहे, असा स्पष्ट खुलासा चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला. प्रांताध्यक्षांनी आधीच स्पष्ट केले होते की, गटनेता हा ना धानोरकर गटाचा असेल, ना वडेट्टीवार गटाचा, तर तो प्रांताध्यक्षांचा असेल, असे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात शुक्रवारी रात्री ‘नवराष्ट्र’शी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार गटनेत्याचे नाव पक्षाकडे सादर करण्यात आले आहे. सुरेंद्र अडवाले यांची काँग्रेस गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडून निवडून आलेले सर्व नगरसेवक हे काँग्रेसचेच असून, कोणाचाही पक्षाबाहेरील विषय नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. सर्व नगरसेवकांचे आमच्या गटात स्वागत आहे. आता काँग्रेस पक्षाचा अधिकृत गट तयार झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
हेदेखील वाचा : Chandrapur News: डिजिटल युग तरीही बँकेत रांगा! प्रशिक्षणाच्या अभावामुळे वृद्ध व अशिक्षित ग्राहक अडचणीत
दरम्यान, दोन्ही गटांमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रांताध्यक्षांनी सुरेंद्र अडबाले यांची नियुक्ती केली होती. त्यानुसार दुपारी एक वाजेपासून सर्वजण एकत्र बसून चर्चा करत होते आणि अखेरीस प्रदेशाध्यक्षांनी गटनेत्याचे नाव अंतिम केले, असे धानोरकर यांनी स्पष्ट केले.
…अशा वक्तव्यांना महत्त्व देत नाही
गट स्थापनेवर आरोप करणाऱ्यांवर प्रतिक्रिया देताना, आरोप करणारी व्यक्ती जबाबदार नसल्याने अशा वक्तव्यांना महत्त्व देत नसल्याचे खासदार धानोरकर म्हणाल्या, स्वतः विजय वडेट्टीवार यांनी थेट भूमिका मांडली असती, तर ती ग्राह्य धरली गेली असती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौर काँग्रेसचाच बनेल
नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर महापौर काँग्रेसचाच बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकूण २७ नगरसेवकांची रीतसर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, कोणतीही पक्षपाती भूमिका घेतलेली नाही. समोरचा गट न्यायालयात गेला तरी सर्व प्रक्रिया नियमांनुसार झाल्याने त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर दिले जाईल, असा विश्वासही खासदार धानोरकर यांनी व्यक्त केला.
हेदेखील वाचा : ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण






