फोटो सौजन्य- pinterest
समर्थ रामदास स्वामींची जयंती दरवर्षी चैत्र शुद्ध नवमीला म्हणजे श्रीराम नवमीला साजरी केली जाते. १६०८ मध्ये जांब (जि. जालना) येथे जन्मलेले नारायण सूर्याजी ठोसर हे शिवरायांचे आध्यात्मिक गुरू, दासबोधकार आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. प्रभू श्रीरामांचे निस्सीम भक्त असलेल्या समर्थांनी महाराष्ट्रात रामोपासना, स्वधर्मनिष्ठा व राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. त्यानिमित्ताने त्यांच्या एका निस्सीम शिष्याविषयी माहिती आपण जाणून घेऊया.
समर्थ रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी ही गुरुशिष्याची अलौकिक जोडी त्या काळात महाराष्ट्राने पाहिली. आदर्श गुरुशिष्याची जी लक्षणे समर्थांनी दासबोधात सांगितली आहेत, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे समर्थ रामदासस्वामी आणि त्यांचा शिष्योत्तम कल्याणस्वामी.
गुरूंचे आज्ञापालन केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली, त्यातीलच एक होते कल्याणस्वामी! त्यांचे मूळचे नाव अंबाजी. एकदा समर्थ रामदास स्वामींनी अंबाजीला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितले. ही फांदी तोडताना विहिरीत पडण्याचा धोका होता; तरीही अंबाजीने गुर्वाज्ञा प्रमाण मानून कुर्हाडीने फांदी तोडण्यास आरंभ केला. फांदी तोडण्यात मग्न झालेला अंबाजी काही वेळाने त्या फांदीसहित विहिरीत पडला. सर्व जण घाबरले. समर्थांना हे कळताच ते तेथे आले. त्यांनी विहिरीत डोकावून विचारले, अंबाजी, कल्याण आहे ना? हो, कल्याण आहे स्वामी !, विहिरीतून उत्तर आले. चल ये तर मग वरती. समर्थांचे वाक्य ऐकताच अंबाजी वर आला आणि समर्थांच्या कृपेने सुखरूप असल्याचे त्याने सांगितले. त्या दिवसापासून समर्थांसहित सर्व जण त्याला कल्याण या नावाने हाक मारू लागले.
समर्थ रामदासस्वामी सज्जनगडावर असताना कल्याणस्वामी प्रतिदिन त्यांच्या स्नानासाठी उरमोडी नदीतून पाण्याने भरलेले हंडे सज्जनगडावर घेऊन येत असत. हे हंडे आजही तेथे पाहायला मिळतात. ३० वर्षांच्या कालखंडामध्ये त्यांनी समर्थांचे सर्व साहित्य लिहून दिले. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या शिवथर घळ या ठिकाणी समर्थांनी कल्याणस्वामींकडून आपला दासबोध हा ग्रंथ लिहून घेतला. ते समर्थांना कीर्तनामध्ये साथ करत असत. तसेच त्यांच्याबरोबर सर्वत्र भ्रमण करत असत. समर्थ रामदासांनी त्यांना समाधीअवस्थेची अनुभूती दिली होती.
वर्ष १६७८ मध्ये समर्थ रामदासांनी कल्याणस्वामींना डोमगावला जाण्याची आज्ञा केली. जेव्हा समर्थ रामदासस्वामींनी वर्ष १६८१ मध्ये समाधी घेतली, त्यावेळी कल्याणस्वामी डोमगावला होते. गुरूंच्या विरहाने व्याकूळ होऊन ते सज्जनगडावर गेले, तेव्हा समाधी दुभंगून समर्थांनी त्यांना दर्शन दिले. त्यानंतर मात्र कल्याणस्वामी सज्जनगडावर कधीही गेले नाहीत; कारण त्यांना संपूर्ण सज्जनगडच समर्थरूप भासत होता. वर्ष १७१४ मध्ये योगबलाने कल्याणस्वामींनी परांडा येथे देह ठेवला.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: हे नाते अत्यंत श्रद्धा, निष्ठा आणि पूर्ण समर्पणावर आधारित होते. कल्याणस्वामींनी गुरूंच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करून आदर्श शिष्यत्व दाखवले.
Ans: कल्याणस्वामींचे मूळ नाव अंबाजी होते. गुरूंच्या कृपेने त्यांना “कल्याण” हे नाव मिळाले.
Ans: गुरूभक्ती आणि आज्ञापालनाचे महत्त्व, निःस्वार्थ सेवा आणि समर्पण, श्रद्धेमुळे मिळणारी आध्यात्मिक उंची






