International Dust Storm Day : वाळू आणि धुळीच्या वादळांचे जागतिक संकट; मानवी आरोग्य, शेती आणि अर्थव्यवस्थेला बसणारा मोठा फटका ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Health impacts of sand and dust storms PM2.5 : निसर्गाची चक्राकार गती बदलत चालली आहे आणि त्याचे सर्वात भीषण रूप आपल्याला ‘वाळू आणि धुळीच्या वादळांच्या’ (Sand and Dust Storms) स्वरूपात पाहायला मिळत आहे. एकेकाळी केवळ वाळवंटी प्रदेशापुरती मर्यादित असलेली ही वादळे आता जागतिक स्तरावर मानवी वस्त्यांपर्यंत पोहोचली आहेत. याच वाढत्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित धोक्याविरुद्ध लढण्यासाठी आणि जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १२ जुलै रोजी ‘वाळू आणि धुळीच्या वादळांविरुद्ध लढण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस’ (International Day of Combating Sand and Dust Storms) साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की, आपण निसर्गाशी जे खेळ खेळत आहोत, त्याचे परिणाम आता आपल्या आरोग्याला आणि उपजीविकेला भोगावे लागत आहेत.
वाळू आणि धुळीची वादळे ही पृथ्वीच्या नैसर्गिक जैव-रासायनिक चक्राचा एक भाग असली, तरी अलिकडच्या काळात मानवी चुकांमुळे त्यांची वारंवारता आणि दाहकता प्रचंड वाढली आहे. जंगलतोड (Deforestation), पाण्याचा अमर्याद उपसा, अति-चराई (Overgrazing) आणि हवामान बदलामुळे (Climate Change) वाढणारा दुष्काळ यामुळे सुपीक जमिनीचे वाळवंटात रूपांतर होत आहे. जेव्हा तीव्र वारे या कोरड्या आणि उघड्या पडलेल्या मातीला स्पर्श करतात, तेव्हा लाखो टन धूळ वातावरणात मैलोनमैल उंच उडते. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अहवालानुसार, ही वादळे केवळ एका देशापुरती मर्यादित न राहता शेकडो आणि हजारो किलोमीटरचा प्रवास करून दुसऱ्या देशातही हाहाकार माजवतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indian Army: ‘काश्मीरच्या प्रत्येक स्मशानभूमीत पाकिस्तानी दहशतवादी दफन’; हिजबुल कमांडरच्या VIDEO’ने वाढवले आंतरराष्ट्रीय दडपण
या वादळांचा सर्वात घातक परिणाम थेट मानवी आरोग्यावर होतो. जेव्हा वाळू आणि धुळीची वादळे येतात, तेव्हा हवेमध्ये अत्यंत सूक्ष्म धूलिकण (PM2.5 आणि PM10) पसरतात. हे सूक्ष्म कण श्वासाद्वारे थेट आपल्या फुफ्फुसांत आणि रक्तप्रवाहात प्रवेश करतात. यामुळे दमा (Asthma), क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आणि इतर गंभीर श्वसनविकारांचा धोका कैक पटीने वाढतो.
जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) मते, ही वादळे केवळ श्वसनाचे आजारच निर्माण करत नाहीत, तर डोळ्यांची जळजळ, त्वचेची ॲलर्जी आणि काही आफ्रिकन देशांमध्ये प्राणघातक ‘मेनिन्जायटिस’ (Meningitis) सारख्या आजारांचा प्रसार करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.
आरोग्यासोबतच या वादळांमुळे जगाची अन्नसुरक्षाही धोक्यात आली आहे. वादळामुळे हवेत उडणारी धूळ जेव्हा सुपीक शेतजमिनीवर साचते, तेव्हा पिकांचे प्रचंड नुकसान होते. झाडांच्या पानांवर धुळीचा थर साचल्यामुळे त्यांची प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) करण्याची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे पिकांची वाढ खुंटते. तसेच, तीव्र वाऱ्यांमुळे जमिनीचा वरचा सुपीक थर उडून जातो, ज्याला ‘जमिनीची धूप’ म्हणतात. यामुळे शेतकरी देशोधडीला लागत असून जागतिक अर्थव्यवस्थेला दरवर्षी अब्जावधी डॉलर्सचा फटका बसत आहे. शिवाय, यामुळे विमान वाहतूक खोळंबते आणि सौरऊर्जा प्रकल्पांची कार्यक्षमताही घटते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Nuclear: 14-कलमी शांतता कराराच्या चिंधड्या उडवत इराणचे अणु ठिकाणांवर गुप्त मिशन; सॅटेलाइट इमेजेसने सत्य आले समोर
या संकटाचे गांभीर्य ओळखून संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) केवळ हा आंतरराष्ट्रीय दिवस घोषित केला नाही, तर २०२५-२०३४ हे संपूर्ण दशक ‘वाळू आणि धुळीच्या वादळांविरुद्ध लढण्याचे दशक’ म्हणून घोषित केले आहे. यंदाच्या वर्षाची अधिकृत थीम ‘From Source to Impact: Protecting Land and Life from Sand and Dust Storms’ अशी ठेवण्यात आली आहे, ज्याचा अर्थ या वादळांच्या उगमस्थानापासून ते त्यांच्या प्रभावापर्यंत जमीन आणि मानवी जीवनाचे रक्षण करणे असा आहे.
या जागतिक संकटावर मात करण्यासाठी कोणत्याही एका देशाचे प्रयत्न पुरेसे नाहीत, कारण धुळीची वादळे आंतरराष्ट्रीय सीमा मानत नाहीत. यासाठी जागतिक स्तरावर ‘अर्ली वॉर्निंग सिस्टम’ (Early Warning Systems) म्हणजेच पूर्वसूचना देणारी यंत्रणा मजबूत करणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे, वाळवंटाच्या कडेला ‘ग्रीन वॉल’ (हरित भिंत) तयार करणे आणि शेतीमध्ये पाण्याचा योग्य वापर करून शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे हाच यावरील एकमेव प्रभावी उपाय आहे. जेव्हा आपण निसर्गाला पुन्हा हिरवेगार करू, तेव्हाच या धुळीच्या संकटापासून स्वतःचा श्वास वाचवू शकू.






