सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : स्त्रीच स्त्रीची शत्रू असते, या मताशी मी सहमत आहे. परंतु स्त्रियांनी एकमेकींना साथ देऊन प्राेत्साहीत केले पाहीजे असे मत बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले. तसेच गरजवंताना काय देता येईल याचाही विचार करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नवभारत वृत्तसमुहाच्या दैनिक नवराष्ट्रच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुनंदा पवार यांनी ‘महिलांचा सन्मान आणि महिला सक्षमीकरण’ या विषयी भाष्य केले. या प्रसंगी व्यासपीठावर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले हे उपस्थित हाेते. दैनिक नवराष्ट्रच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘तेजाेत्सव’ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले.
पुरस्कारार्थी पाेलिस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे यांनी मांडलेल्या मताचा संदर्भ घेत सुनंदा पवार म्हणाल्या, ‘‘स्त्रीच स्त्रीची शत्रू असते यावर मी सहमत आहे परंतु स्त्रियांनी स्त्रियांना साथ देऊन प्रोत्साहित केले पाहिजे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.’’ महीलांच्यासंदर्भात ट्रस्टमार्फत केल्या जाणाऱ्या कामाची माहीती सुनंदा पवार यांनी दिली, त्या म्हणाल्या,‘‘ आम्ही सुरु केलेल्या अकादमी मध्ये महाराष्ट्रात ६०० हून अधिक महिला पोलिस अधिकारी बनल्या आहेत. २००८ पासून पुण्यात भीमथडी जत्रा कार्यक्रम आयोजित करतो. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात संस्कृती आणि ग्रामीण विकासासोबतच महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले जाते. ’’
महिला समर्थपणे सांभाळतात जबाबदारी
अभिनेत्री प्राजक्ताने राजमाता जिजाऊ, राणी येसुबाई यांच्या कार्याचा उल्लेख करीत स्त्री शक्ती काय करू शकते हे विषद केले. ‘‘स्त्री ही अशी शक्ती आहे, जी उंबऱ्याच्या आत आणि उंबऱ्याच्या बाहेरील जबाबदारी समर्थपणे सांभाळते. मला एक स्त्री असल्याचा अभिमान आहे. अशा पुरस्कारांमुळे महिलांना अजून काम करण्यास ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळते,’’ असे प्राजक्ताने नमूद केले. तर मेघराजराजे भोसले यांनी नवभारत आणि नवराष्टच्यावतीने महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविल्या जाणऱ्या उपक्रमांचे काैतुक करीत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या पुर्वार्धात पुरस्कार विजेत्यांपैकी काही महीलांनी चर्चासत्रात त्यांच्या खडतर प्रवासाबद्दल, कुटुंबाचे पाठबळ, स्वतःचे चांगले वाईट अनुभव सांगितले. सोबतच पुरस्कार मिळाल्याने पुढे काम करण्याचा आत्मविश्वास मिळतो असे त्यांनी नमूद केले.
आपल्या घरातील ज्या वस्तू गरजेच्या नाही त्या गरजू व्यक्तींना दया कारण आपल्या घरातली अडगळ हि कोणाच्या तरी घरातली गरज भागवू शकते. पेहलगाम च्या घटनेनंतर जीवन क्षणभंगूर आहे हे समजले. यामुळे जगण्यासोबत आपण समाजाचा हि विचार केला पाहिजे. असंही ते म्हणाले.