World Thyroid Day 2025: महिलांना थायरॉईडचा धोका अधिक का असतो? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Thyroid Day 2025 : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांशी सामना करावा लागत आहे. त्यामध्ये थायरॉईड हा एक गंभीर पण दुर्लक्षित आजार ठरतो. याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २५ मे रोजी ‘जागतिक थायरॉईड दिन’ (World Thyroid Day) साजरा केला जातो. विशेषतः महिलांमध्ये थायरॉईडच्या समस्या अधिक प्रमाणात आढळतात, यामागे हार्मोनल बदल, तणाव आणि अनुवंशिकता ही मुख्य कारणे आहेत.
थायरॉईड ही मानेला जुळून असलेली फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे, जी T3 आणि T4 हे दोन महत्त्वाचे संप्रेरक (हॉर्मोन्स) तयार करते. याचा मुख्य उद्देश म्हणजे शरीरातील चयापचय क्रिया नियंत्रित करणे. म्हणजेच शरीरातील ऊर्जा वापर, तापमान नियंत्रण आणि स्नायूंची कार्यक्षमता यावर थायरॉईडचा थेट प्रभाव असतो.
थायरॉईडचे दोन मुख्य विकार आढळतात:
1. हायपोथायरॉईडीझम (Hypothyroidism) – ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी आवश्यक तेवढे हार्मोन्स तयार करत नाही.
2. हायपरथायरॉईडीझम (Hyperthyroidism) – ज्यामध्ये ग्रंथी आवश्यकतेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार करते.
दोन्ही अवस्थांमध्ये शरीरातील अनेक जैविक प्रक्रियांवर परिणाम होतो आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये हार्मोनल चढ-उतार सतत सुरू असतो. मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूती आणि रजोनिवृत्ती या सर्व अवस्थांमध्ये हार्मोनल संतुलन बिघडू शकते. याचा थेट परिणाम थायरॉईड ग्रंथीच्या कार्यक्षमतेवर होतो. याशिवाय, तणावाची पातळीही महिलांमध्ये अधिक असते. घर, करिअर, कुटुंब अशा सर्व जबाबदाऱ्यांमुळे ताण वाढतो. तणावामुळे कॉर्टिसोल हा संप्रेरक वाढतो, जो थायरॉईड कार्यावर परिणाम करतो. तसेच, कुटुंबात जर थायरॉईडचा इतिहास असेल तर महिलांमध्ये या आजाराचा धोका अधिक असतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्धाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले, भारताच्या ‘S-400’ ने पाकच्या AWACS चा उडवला धुवा; रचला विश्वविक्रम
थायरॉईडच्या विकारांमध्ये खालील लक्षणे आढळू शकतात:
वजन अचानक वाढणे किंवा घटणे
1) कोरडी व खवखवीत त्वचा
2) चेहरा फुगलेला वाटणे
3) असमर्थ मासिक पाळी
4) केस गळणे आणि विरळ होणे
5) नैराश्य किंवा मानसिक अशक्तपणा
6) थकवा आणि ऊर्जा कमी वाटणे
7) सांधेदुखी आणि स्नायू दुखणे
8) मूड स्विंग्स किंवा चिडचिड
थायरॉईडच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी जीवनशैलीतील काही सकारात्मक बदल फायदेशीर ठरू शकतात:
1. योगासने आणि ध्यान – तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी
2. निरोगी आणि संतुलित आहार – आयोडिनयुक्त पदार्थ, हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य
3. जंक फूड आणि साखर यांचे प्रमाण कमी करा
4.धूम्रपान आणि मद्यपान टाळा
5. नियमित झोप आणि व्यायाम – हार्मोन संतुलनासाठी अत्यंत गरजेचे
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डोनाल्ड ट्रम्पचे ‘Air Force One’ जगात भारी; राजेशाही थाट पाहून तुमचेही डोळे दीपतील
जागतिक थायरॉईड दिनानिमित्त, प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विशेषतः महिलांनी आपल्या हार्मोनल आरोग्याकडे लक्ष द्यावे, कारण त्यांना थायरॉईड विकार होण्याचा धोका अधिक असतो. वेळच्यावेळी चाचण्या, योग्य आहार, तणावमुक्त जीवनशैली आणि शारीरिक सक्रियता यामुळे हा आजार नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. थायरॉईड एक ‘सायलेंट डिसऑर्डर’ आहे, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता सजग राहणे हेच खरे आरोग्य!