IPL 2025 सामन्यांमध्ये सर्रास बेटिंग, पेन ड्राईव्हमध्ये सर्व माहिती; अंबादास दानवेंकडून महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप.. (फोटो-सोशल मीडिया)
मुंबई : आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम सुरू झाला आहे. आता या हंगामात सट्टेबाजांची टोळी सक्रिय झाली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांपासून लपूनछपून सट्टेबाजीचा धंदा जोरात सुरू आहे. काही लोक ‘इंडियन प्रीमियर लीग’ क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत आहेत. त्यांना मुंबई पोलीस संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी केला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
विधान परिषदेतील शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे म्हटले आहेत की, बेटिंगशी संबंधित विविध संभाषणे तसेच बेटिंग ऑपरेशन्सचा तपशील पेन ड्राईव्हमध्ये संकलित करून तो विधान परिषद अध्यक्षांना सादर करणार असल्याचे म्हटले आहे.
दानवे यांनी असा दावा केला आहे की, त्याच्याकडे पेन ड्राईव्ह आहे ज्यामध्ये ‘लोटस 24’ नावाच्या ॲप्लिकेशनबाबतचे फोन कॉलचा तपशील आहे. ज्याचा वापर क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करण्यासाठी केला जात आहे. मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन यांचा पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी संपर्क करण्यात आला आहे. यात मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले तसेच मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या संरक्षणात ही सारी सट्टेबाजी सुरू असल्याचे देखील अंबादास दानवे यांनी सांगितले.
दानवे पुढे म्हणाले की, राज्य पोलीस विभागाच्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये क्रिकेट सामन्यांशी संबंधित सट्टेबाजीच्या 7, 82, 960 घटनांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने 2022-23 आणि सत्र 2023-24 च्या गुन्ह्यांचा अहवाल जाणूनबुजून सार्वजनिक करण्यात आला नसल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
दानवे म्हणाले की, राज्यात गतवर्षी 7 हजार 982 बलात्काराचे तर 16 हजार 200 विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर्षी दररोज 22 बलात्कार आणि 45 विनयभंगाच्या घटना घडल्याचे समोर येत आहेत. गुन्हेगारांवर कारवाई करण्यात इतका हलगर्जीपणा का? असा प्रश्न देखील दानवे यांनी उपस्थित केला आहे.
तसेच अंबादास दानवे यांनी कारागृहांमध्ये वाढत्या गर्दीचा मुद्दा देखील उपस्थित केला. ते म्हणाले की, राज्यातील कारागृहांची क्षमता 27 हजार कैद्यांची असताना तेथे 43 हजार कैदी ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. 2024 मध्ये राज्यात 51,000 कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे झाले असल्याची नोंद झाली आहे. असे देखील त्यांनी सांगितले.