मुंबई : आयपीएल मधील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील एक प्रकरण आता सर्वांसमोर आले असून या प्रकरणी अंबानी यांना बीसीसीआयने नोटीस पाठवली आहे. तसेच या नोटिसीला लवकरात लवकर लेखी उत्तर देण्याचे मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांना सांगण्यात आले आहे.
बीसीसीआयचे नीतिमत्ता अधिकारी विनीत सरन यांनी शुक्रवारी मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांना नोटीस पाठवली आहे. नीता अंबानी यांच्याबाबतची तक्रार ही माजी एमपीसीए सदस्य संजीव गुप्ता यांनी केली होती. तेव्हा अंबानी यांना २ सप्टेंबरपर्यंत त्यांच्यावरील हितसंबंधांच्या विरोधातील आरोपांवर लेखी उत्तर देण्यास सांगितले आहे.
हे आहेत नीता अंबानीन वरील आरोप….
संजीव गुप्ता यांनी आरोप केला की, ” मुंबई इंडियन्सच्या मालकांनी आयपीएलमध्ये परस्पर हितसंबंध जपले आहेत. कारण नीता अंबानी या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये देखील संचालक आहे, या कंपनीने अलीकडेच वायकॉम १८ मार्फत २३, ७५८ कोटी रुपयांना आयपीएल डिजिटल अधिकार विकत घेतले आहेत. त्यामुळे त्यांनी परस्पर हितसंबंध जपल्याचे समोर येत आहे. कारण वायकॉम १८ ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे. त्यामुळे एकाच वेळी एका कंपनीतील व्यक्ती संघही विकत घेते आणि स्पर्धेचे हक्कही विकत घेते, हे कसे होऊ शकते. त्यामुळेच नीता अंबानी यांनी परस्पर हितसंबंध जपलेले आहेत आणि त्यामुळेच मी त्यांची तक्रार केलेली आहे.” असे गुप्ता यांनी सांगितले.
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असून आतापर्यंत आयपीएलची सर्वाधिक जेतेपदे ही मुंबई इंडियन्सने जिंकलेली आहे. यापूर्वी नीता अंबानी किंवा रिलायन्स यांच्या नावावर फक्त मुंबई इंडियन्स हा संघच होता. पण यावर्षी रिलायन्सच्या उपकंपनीने आयपीएलचे डिजिटल हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे हा नवा वाद आता समोर आला असून त्यामुळे नीता अंबानी या नोटीशीला काय उत्तर पाठवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागेलेले आहे.






