फोटो सौजन्य - Mufaddal Vohra सोशल मीडिया
कर्णधार रोहित शर्मा : भारताच्या संघाने मागील काही वर्षांमध्ये रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये कमालीची कामगिरी सातत्याने केली आहे. भारताच्या संघाने २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात T२० विश्वचषक जिंकला आणि संपूर्ण भारतामध्ये त्याचा जल्लोष साजरा करण्यात आला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही टीम इंडियाने बांगलादेशला हरवून विजयाने सुरुवात केली आहे. काल झालेल्या बांग्लादेश विरुद्ध सामन्यांमध्ये ११००० धावांचा टप्पा तर पार केला आहेच आता त्यांनी आणखी एक विक्रम नावावर केला आहे.
रोहित शर्माने रिकी पॉन्टिंग, कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली यासारख्या दिग्गज कर्णधारांना त्याने मागे टाकले आहे. बांगलादेशविरुद्धचा विजय हा रोहित शर्माचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० वा विजय होता. हा विजय रोहितसाठीही खास होता कारण या विजयासोबत त्याने धोनी आणि रिकी पॉन्टिंग सारख्या दिग्गज कर्णधारांनाही मागे टाकले.
रोहित शर्माने आतापर्यंत १३९ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे ज्यापैकी संघाने १०० सामने जिंकले आहेत. जर आपण कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या विजयाच्या टक्केवारीबद्दल बोललो तर ते ७३ आहे. या बाबतीत त्याने रिकी पॉन्टिंगला मागे टाकले आहे. रिकी पॉन्टिंगने ३२४ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे, त्यापैकी त्याने २२० सामने जिंकले आहेत आणि ७७ सामने गमावले आहेत. त्याची विजयाची टक्केवारी ६७.९० आहे.
ROHIT SHARMA HAS WON 100 MATCHES AS CAPTAIN FROM JUST 138 GAMES 🤯 pic.twitter.com/sLjI4O1Tyd
— Johns. (@CricCrazyJohns) February 21, 2025
रोहित शर्मा एक उत्तम कर्णधार आहे, त्याने आयपीएलपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत हे सिद्ध केले आहे. कर्णधारपद भूषवताना रोहित शर्माने १२ कसोटी, २८ एकदिवसीय आणि ५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. अलिकडे, रोहितच्या नेतृत्वाखाली, कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी निश्चितच घसरली आहे, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय आणि टी-२० मध्ये टीम इंडियाने उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे.
कर्णधाराचे नाव | सामने | जीत | हार | जिंकण्याची टक्केवारी (%) |
---|---|---|---|---|
रोहित शर्मा | 137 | 100 | 33 | 73.00% |
रिकी पाॅटिंग | 324 | 220 | 77 | 67.90% |
स्टीव वॉ | 163 | 108 | 44 | 66.25% |
हॅन्सी क्रोनी | 191 | 126 | 46 | 65.96% |
विराट कोहली | 213 | 137 | 60 | 64.00% |
क्लाइव लॉयड | 158 | 100 | 30 | 63.00% |
भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दमदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने बांग्लादेश पराभूत केले आहे, आता भारताचा पुढील सामना २३ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी सर्व क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. तर टीम इंडियाचा शेवटचा सामना २ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. ग्रुप अ मधील न्यूझीलंडचा संघ एक मजबूत संघ आहे. पाकिस्तानच्या संघाला भारताविरुद्ध होणारा सामना जिंकणे अनिवार्य आहे तर त्या सामन्यात पाकिस्तानचा संघ पराभूत झाल्यास संघ सेमीफायनलच्या शर्यतीमधून बाहेर होईल.