करुण नायर(फोटो-सोशल मीडिया)
DC vs MI : आयपीएल २०२५ चा १८ हंगामातील २९ वा सामना काल दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत मुंबईने २०५ धावा उभारल्या होत्या. प्रतिउत्तरात दिल्ली १९३ धावाच करू शकला. या सामन्यात दिल्लीकडून करुण नायरने दिल्लीच्या विजय मिळवण्याच्या आशा पल्लवित केल्या होत्या. टो खेळ होता तोपर्यंत असे वाटत होते की, दिल्ली सामना सहज जिंकेल परंतु सॅटनरने त्याची विकेट काढली आणि सामना फिरला. नायरने ४० चेंडूत ८९ धावा केल्या. यामध्ये त्याने १२ चौकार आणि ५ षटकार लगावले. दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला आणि त्याची खेळी व्यर्थ गेली. मुंबई इंडियन्सने हा सामना १२ धावांनी आपल्या खिशात घातला.
हे वर्ष करुण नायरसाठी खूप चांगले जात असल्याचे दिसून येत आहे. करुणने प्रथम रणजी ट्रॉफीमध्ये, नंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये खोऱ्याने धावा केल्या आणि आता त्याने आयपीएलमध्ये मिळालेल्या संधीचा चांगला फायदा घेत दमदार खेळी केली. आयपीएलमध्ये पुनरागमन करणारा करुण नायर आपला पहिला सामना खेळण्यासाठी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सज्ज होता तसेच त्याला कशा पद्धतीने खेळायचे आहे, ही चांगले माहिती होते.
मुंबईने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीच्या करुण नायरने जसप्रीत बुमराहला आव्हान दिले होते. त्याने बुमराहच्या ९ चेंडूत २६ धावा कुटल्या. जसप्रीत बुमराहला एकाच षटकामध्ये दोन षटकार लगावण्याची क्षमता फार कमी फलंदाजांकडे असते, पण करुणने ते सुद्धा या सामन्यात करुन दाखवले आहे. त्याची कामगिरी त्याच्या प्रभावी स्थानिक फॉर्ममुळे देखील बघण्यास मिळाली. ज्यामध्ये त्याने गेल्या हंगामात विदर्भासाठी सर्व फॉरमॅटमध्ये १८७० धावा चोपल्या होत्या.
भारताकडून कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावणाऱ्या करुणने सामन्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. खरे सांगायचे तर, मी यापूर्वी आयपीएल खेळलो असल्याने मला आत्मविश्वास होता. मला कसे खेळायचे हे देखील माहित होते. माझ्यासाठी ते काही नवीन असे नव्हते. माझ्या मनात सगळी तयारी झाली होती. मी फक्त संधीची वाट पाहत आहे. काही चेंडू खेळून पुन्हा लयीत येण्याची गरज होती.
करुण नायरने पॉवरप्ले दरम्यान पारंपारिक शॉट्स खेळण्याबद्दल बोलताना सांगितले की, २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सचा एक भाग असलेला करुण म्हणाला की, ‘मी स्वतःला सांगत होतो की स्वतःला वेळ दे, सामान्य शॉट्स खेळ आणि त्यानंतर तुम्ही वेगाने खेळू शकता. सगळं तसंच घडत गेलं पण जर संघ जिंकला असता तर नक्कीच जास्त आनंद झाला असता. आता त्याला काही अर्थ नाही. मी चांगला खेळलो पण मी ते पूर्ण करू शकलो नाही.’