अक्षर पटेल(फोटो-सोशल मीडिया)
DC Vs MI : आयपीएल २०२५ चा १८ हंगाम चांगलाच रंगात आला आहे. आतापर्यंत २९ सामने खेळवण्यात आले आहेत. २९ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सकडून १२ धावांनी पराभव स्वीकारावा लगाला आहे. या हंगामात दिल्लीचा हा पहिलाच पराभव ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्सला दिल्लीच्याच मैदानावर आपला पहिला पराभव पत्करण्याची वेळ आली. लागोपाठ चार सामने जिंकल्यानंतर दिल्लीला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासोबतच, बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराला दणका देखील दिला आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२५ मधील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटकांचा कोटा वेळेवर पूर्ण करता आला नाही. त्यानंतर बीसीसीआयकडून दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अक्षर पटेलने वेळेवर षटक न टाकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
बीसीसीआयने एक प्रेस रिलीज जारी करून त्यामध्ये म्हटले आहे की, ‘आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत वेळेवर षटके पूर्ण न करण्याचा हा अक्षर पटेलच्या संघाचा हंगामातील पहिलाच गुन्हा आहे. जे कमीत कमी ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे, म्हणून अक्षरला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आलाअ आहे.’
या सामन्यात अक्षर पटेलची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. गोलंदाजी करताना अक्षरने दोन षटकांत तब्बल १९ धावा मोजाव्या लागल्या आहेत. यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. फलंदाजी करताना अक्षरने चांगली सुरुवात केली पण बुमराहने त्याला माघारी पाठवले.
दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत २०५ धावा केल्या. ज्यामध्ये रोहितने १८, रिकेल्टनने ४१, सूर्यकुमार यादवने ४०, तिलक वर्मा यांनी ५९ आणि नमन धीरने नाबाद ३८ धावा केल्या. त्या जोरावर मुंबईने २०५ धावा केल्या. प्रतिउत्तरात दिल्ली एकेकाळी विजय मिळवेल असे वाटत असताना मुंबईच्या गोलंदाजांनी सामना फिरवला आणि १२ धावांनी विजय मिळवला. दिल्लीकडून करुण नायरने चांगली कामगिरी केली. त्याने ८९ धावा केल्या तर अभिषेक पोरेलने ३३, केएल राहुलने १५, आशुतोष शर्माने १७ आणि विप्राजने १४ धावा केल्या परंतु विज्यापासून दुरच राहिले.