फोटो सौजन्य - सोशल मिडिया
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या अॅशेस कसोटीत इंग्लंडचा ८२ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. या विजयासह, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व अबाधित आहे. ऑस्ट्रेलियाने सध्याच्या WTC मध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत आणि सर्व सामने जिंकून, संघ १०० टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, पराभवाची हॅटट्रिक झेलणाऱ्या इंग्लंड संघाची स्थिती भारतापेक्षाही वाईट आहे. इंग्लंडचा विजयाचा टक्का आता ३० पेक्षा कमी झाला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर, WTC पॉइंट्स टेबल अपडेट करण्यात आले आहे ज्यामध्ये गतविजेता दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. भारतात २-० ने मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे ७५% गुण आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका व्यतिरिक्त, न्यूझीलंड, श्रीलंका आणि पाकिस्तान हे देश टॉप-५ मध्ये आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया टॉप ५ मधून बाहेर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून व्हाईटवॉश झाल्यानंतर टीम इंडियाची अवस्था वाईट आहे.
WTC पॉइंट्स टेबलमध्ये इंग्लंडची परिस्थिती भारतापेक्षाही वाईट आहे. इंग्लंडने आतापर्यंत खेळलेल्या आठ कसोटींपैकी फक्त दोनच कसोटी जिंकल्या आहेत, तर पाच गमावल्या आहेत. भारताविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडल्यानंतर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेत ते ०-३ ने पिछाडीवर आहेत.
Australia continue their reign at the top of the #WTC27 standings following a stellar win in Adelaide 🏏 More from the latest #AUSvENG Test 👉 https://t.co/Zwi3UpkPtp pic.twitter.com/wSCgS7yQtb — ICC (@ICC) December 21, 2025
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने अॅलेक्स कॅरीच्या शतकाच्या जोरावर ३७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड २८६ धावांवर सर्वबाद झाले आणि यजमान संघाला ८५ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात, ट्रॅव्हिस हेडने कॅरीसह इंग्लंडला धुव्वा उडवून त्याच्या कारकिर्दीतील ११ वे शतक ठोकले. हेडने जेव्हा जेव्हा शतक ठोकले आहे तेव्हा ऑस्ट्रेलियाला फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ३४९ धावा केल्या आणि ४३५ धावांचे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना संपूर्ण इंग्लंड संघ ३५२ धावांवर सर्वबाद झाला.






