Gautam Gambhir : समस्यांनी ग्रासलेला गौतम गंभीर कालीमातेच्या चरणी; कोलकाता पहिल्या टी-20 सामन्याअगोदर कालीघाट मंदिर दर्शनाला
Gautam Gambhir Kalighat Mandir : गेल्या काही महिन्यांत भारतीय संघाची कामगिरी काही खास राहिलेली नाही. या खराब कामगिरीदरम्यान, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. तसेच, त्यांना टिकेलासुद्धा सामोरे जावे लागले आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कोलकात्यातील कालीघाट मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेला होता.
उद्या ईडन गार्डनवर रंगणार सामना
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका २२ जानेवारीपासून सुरू होणार असताना गंभीर या दौऱ्यावर आला आहे. कालीघाट मंदिराबद्दल बोलायचे झाले तर ते भारतातील ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. मान्यतेनुसार, माता सतीच्या उजव्या पायाची बोटे येथे पडली होती. हे पूर्व भारतातील सर्वात पवित्र प्रार्थनास्थळांपैकी एक आहे, जिथे दरवर्षी लाखो लोक भेट देतात.
गौतम गंभीर कालीमातेच्या चरणी
Indian Head Coach Gautam Gambhir offers prayers at Kalighat Temple ahead of the England white-ball series ❤️🙏#Cricket #India #Gambhir #INDvENG pic.twitter.com/ggrMmbxqiX
— Sportskeeda (@Sportskeeda) January 21, 2025
गौतम गंभीरच्या प्रशिक्षक काळात भारतीय संघाचे अनेक पराभव
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघाला अनेक लाजिरवाण्या पराभवांना सामोरे जावे लागले आहे. प्रथम त्यांनी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली, त्यानंतर घरच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा व्हाईटवॉश झाला. तर भारताला १० वर्षांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमवावी लागली. आता, इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेव्यतिरिक्त, टीम इंडियासमोर २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असेल.
फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक देखील उपस्थित
गौतम गंभीरसोबत सीतांशु कोटकदेखील कालीघाट मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले. सीतांशू कोटक यांची नुकतीच भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सलग मालिका गमावल्यानंतर गौतम गंभीर प्रचंड दबावाखाली असेल हे नाकारता येत नाही. गंभीरसह, संपूर्ण भारताला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी करावी अशी इच्छा असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळायची आहे, ज्याचा पहिला सामना २२ जानेवारी रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल. टी-२० मालिकेत एकूण पाच सामने खेळवले जातील, तर दोन्ही देशांदरम्यान ६ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होईल.