ऋषभ पंत आणि पंच(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना लीड्स येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यात चार दिवसांचा खेळ संपला असून भारताने इंग्लंडसमोर ४७१ धावांचे टार्गेट दिले आहे. तर प्रतिउत्तरत चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडने २१ धावा केल्या आहेत. जॅक क्रॉली १२ धावा आणि बेन डकेट ९ धावांवर खेळत आहेत. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील सर्व विकेट्स शिल्लक आहेत. भारताकडून केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतके लागावली. या सामन्यादरम्यान भारताचा उपकर्णधार ऋषभ पंतने मोठी चूक झाली आहे, त्यावरून आयसीसीने त्याला चांगलेच फटकारले आहे. जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे?
भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची सामन्यासाठीची बंदी टळली आहे. परंतु, लीड्स कसोटी सामन्यादरम्यान पंचांशी गैरवर्तन केल्याबद्दल त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने ऋषभ पंतला फटकारले आहे आणि त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट देखील जोडण्यात आला आहे. जो भविष्यात त्याच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. चेंडू बदलण्याचे आवाहन पंचांकडून बॉल गेजने तपासल्यानंतर फेटाळण्यात आले. ज्यामुळे पंतचा रंग अनावर झाला आणि त्याने रागात चेंडू फेकून दिला.
आयसीसीने एका मीडिया निवेदनात म्हटले आहे की, ‘रविवारी हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल ऋषभ पंतला अधिकृतपणे फटकारण्यात आले आहे. पंतने खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.८ चे उल्लंघन केल्याचे दिसून आले, जे “आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयाशी असहमती दर्शविण्याशी” संबंधित आहे.’ आयसीसीने पंतला फटकाराव्यतिरिक्त, पंतच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट देखील जोडण्यात आला आहे. २४ महिन्यांच्या कालावधीत हा त्याचा पहिलाच गुन्हा ठरला आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ६१ व्या षटकाच्या शेवटी हा प्रकार घडला आहे. जेव्हा पंचांनी बॉल गेजने चेंडूचा आकार तपासला आणि तो बदलू नये असा निर्णय घेण्यात आला. पंत या निर्णयावर खुश नव्हता. त्याने पंचांसमोर जमिनीवर चेंडू फेकून दिला, या कृतीने त्याने पंचांच्या निर्णयाशी असहमती दर्शविली. पंतने आपला गुन्हा कबूल केला आणि सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी सुचवलेली शिक्षा देखील स्वीकारली, त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही.
हेही वाचा : ENG vs IND : इंग्लडच्या मैदानावर ऋषभ पंतचा पराक्रम, सचिनच्या विक्रमाची बरोबरी! वाचा सविस्तर
मैदानावरील पंच पॉल रीफेल आणि ख्रिस गॅफनी, तिसरे पंच शरफुद-उद-दौला इब्ने शाहिद आणि चौथे पंच माइक बर्न्स यांच्याकडून ऋषभ पंतवर हा आरोप करण्यात आला होता. लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी किमान दंड म्हणजे अधिकृत फटकार, जास्तीत जास्त दंड खेळाडूच्या मॅच फीच्या ५० टक्के आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्स आहे. जर एखाद्या खेळाडूला २ वर्षांच्या आत चार डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय किंवा दोन टी-२० सामन्यांसाठी बंदी घालण्यात येते.