यशस्वी जैस्वाल पुन्हा एकदा अपयशी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
IND vs AFG: ड्रामा, जीवनदान अन्… ! अफगाणिस्तानला ‘ती’ चूक नडली; KL Rahul ने ठोकले अर्धशतक
अफगाणिस्तानविरुद्ध लेग-स्टंपवर झाला बाद
सामन्याच्या पहिल्या दिवशी चांगली सुरुवात करूनही, यशस्वीला आपल्या खेळीचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. तो अफगाण गोलंदाज सलीम साफीच्या गोलंदाजीवर साफ अडकला आणि बाद झाला. साफीच्या षटकातील चौथ्या चेंडूवर, लेग-स्टंपच्या दिशेने येत असताना जैस्वालने एक विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि यष्टीरक्षकाने त्याचा झेल घेतला. सलीम साफीने १३२.९ किमी प्रतितास वेगाने शॉर्ट-ऑफ-लेंथ चेंडू टाकला, जो जैस्वालने फाइन लेगच्या दिशेने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटच्या आतल्या कडेला लागून थेट अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक आसिफ झझाईच्या ग्लोव्हजमध्ये गेला आणि यशस्वी जैस्वाल ३२ चेंडूंमध्ये ५ चौकारांच्या मदतीने केवळ २४ धावा करून बाद झाला.
आयपीएल २०२६ मध्येही निराशाजनक कामगिरी
जैस्वालचा खराब फॉर्म केवळ या कसोटी सामन्यापुरता मर्यादित नाही; नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२६ मध्येही त्याची बॅट अजिबातच चालली नाही आणि त्याने धावांचा पाऊसही पाडला नाही. तसंच वैभव सूर्यवंशीच्या खेळामुळे त्याचा संपूर्ण खेळही झाकोळून गेला. संपूर्ण हंगामात त्याला प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागला आणि एकही मोठी किंवा सामना जिंकून देणारी खेळी तो करू शकला नाही.
या हंगामात तो सर्व १६ सामन्यांमध्ये खेळला, ज्यात त्याने ३०.५० च्या सरासरीने त्याने ४२७ धावा केल्या, त्याची सर्वोच्च धावसंख्या ५१ होती, आणि संपूर्ण स्पर्धेत त्याला केवळ तीन अर्धशतकेच करता आली. एक आक्रमक सलामीवीर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या जैस्वालचा खराब फॉर्म स्पष्टपणे दिसून येत आहे आणि त्यामुळे चाहत्यांना त्याच्या फॉर्मबाबत अधिक चिंता सतावते आहे.
भारतीय संघासाठी वाढती चिंता
बदलाच्या प्रक्रियेतून जात असलेल्या नव्या भारतीय संघात, कर्णधार शुभमन गिलसोबत संघाला एक दमदार आणि आक्रमक सुरुवात करून देण्याची मोठी जबाबदारी यशस्वी जयस्वालवर होती. मात्र, त्याची दीर्घकाळ चाललेली सुमार कामगिरी आता संघ व्यवस्थापनासाठी डोकेदुखी बनत आहे. पुढे येणाऱ्या प्रदीर्घ कसोटी हंगामाच्या पार्श्वभूमीवर, जयस्वालला ही कमकुवत बाजू दूर करून लवकरात लवकर धावा करण्याचे सूत्र शोधावे लागेल. तसंच आपल्या या खराब कामगिरीवरही त्याला काही ना काही उपाय शोधून काढावा लागणार आहे. पहिल्या डावात खराब सुरूवात करून दिल्यानंतर किमान दुसऱ्या डावाकडे सकारात्मकरित्या यशस्वीने लक्ष केंद्रित करावे आणि खेळावे अशीच चाहत्यांची इच्छा आहे.






