फोटो सौजन्य - सोशल मिडिया
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काल भारताची एकदिवसीय मालिका पार पडली. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने शेवटच्या सामन्यामध्ये विजय मिळवला आणि मालिकेचे जेतेपद नावावर केले होते. या मालिकेमध्ये भारताचा स्टार खेळाडू विरोट कोहली याने धुव्वाधार कामगिरी केली. एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये त्याने शतके झळकावली तर शेवटच्या सामन्यामध्ये त्याने अर्धशतक झळकावले आणि शेवटचा चौकार मारुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत प्रभावी कामगिरी केल्यानंतर, विराट कोहली भक्तीत डुंबला आहे. मालिका जिंकल्यानंतर किंग कोहलीने विशाखापट्टणममधील प्रसिद्ध सिंहचलम मंदिराला भेट दिली. मंदिरात पोहोचलेल्या विराटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीची बॅट पुन्हा एकदा गर्जना करत त्याने ४५ चेंडूत ६५ धावांची तुफानी खेळी केली. तीन सामन्यांमध्ये दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावल्याबद्दल विराटला मालिकावीर म्हणूनही निवडण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाच्या विजयात विराट कोहलीच्या फलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने तीन सामन्यांमध्ये ३०२ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा पूर्णपणे नाश केला. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यातील विजयानंतर, कोहलीने विशाखापट्टणममधील प्राचीन सिंहचलम मंदिराचे दर्शन घेतले. व्हायरल व्हिडिओमध्ये, कोहलीने पांढरा टी-शर्ट घातला आहे आणि खांद्यावर टॉवेल गुंडाळलेला आहे. कोहलीच्या हातात फुलांचा हार देखील दिसत आहे.
Virat Kohli at Simhachalam Devasthanam Temple, Vishakapatnam 🙏❤️ pic.twitter.com/bFDX5tDuqQ — Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) December 7, 2025
तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका विराट कोहलीसाठी उल्लेखनीय होती. रांची येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली आणि १२० चेंडूत १३५ धावा केल्या. रायपूर येथेही किंग कोहलीने ९३ चेंडूत १०२ धावा केल्या. मालिकेतील शेवटच्या सामन्यात, टीम इंडियाचा स्टार फलंदाज वेगळ्याच लयीत होता, त्याने फक्त ४५ चेंडूत ६५ धावा केल्या.
त्याच्या खेळीदरम्यान, कोहलीने सहा चौकार आणि तीन उत्तुंग षटकार ठोकले. यशस्वी जयस्वालसोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी अखंड शतकी भागीदारी केली, ज्यामुळे टीम इंडियाने ३९.५ षटकांत फक्त एक विकेट गमावून २७१ धावांचे लक्ष्य गाठले. यशस्वीने त्याचे पहिले एकदिवसीय शतक झळकावले आणि तो ११६ धावांवर नाबाद राहिला. रोहित शर्मानेही ७५ धावा केल्या.






