IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सने केव्हीन पीटरसनवर टाकली मोठी जबाबदारी, मार्गदर्शक म्हणून पाहणार काम
IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सने इंग्लंडचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज केव्हिन पीटरसनला IPL 2025 साठी त्यांचे मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. ४४ वर्षीय केव्हीन पीटरसन मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांच्यासोबत जवळून काम करतील. फ्रँचायझीने २७ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर याची घोषणा केली.
पॉन्टिंग गेल्यानंतर मोठे बदल
IPL 2024 च्या हंगामाच्या शेवटी रिकी पॉन्टिंगपासून वेगळे झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या प्रशिक्षक संरचनेत पूर्णपणे बदल केले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या मेगा लिलावात काही स्मार्ट चाली वापरून खेळाडूंना खरेदी करण्यात बदानीने मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे बदानी हा लिलाव प्रक्रियेचाही एक भाग होता.
पहिल्यांदाच प्रशिक्षकपदाची जबाबदारी
IPL मध्ये केविन पीटरसनची ही पहिलीच प्रशिक्षक भूमिका असणार आहे. तो या लीगमध्ये शेवटचा खेळाडू म्हणून २०१६ मध्ये खेळला होता. तथापि, दिल्ली कॅपिटल्सने नवीन हंगामासाठी अद्याप त्यांचा कर्णधार जाहीर केलेला नाही. वेणुगोपाल राव हे दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक असतील आणि मुनाफ पटेल गोलंदाजी प्रशिक्षक असतील.
पीटरसनला मार्गदर्शक म्हणून का निवडले
केव्हीन पीटरसनचे दिल्ली कॅपिटल्सच्या सह-मालक जीएमआर ग्रुपशी चांगले संबंध आहेत. दिल्ली कॅपिटल्सने मॅथ्यू मॉट यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मॉट यांनी यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्ससोबत काम केले आहे आणि अलीकडेच ते इंग्लंड क्रिकेट संघाशी त्यांच्या व्हाईट-बॉल प्रशिक्षक म्हणून जोडले गेले आहेत. २०२२ मध्ये इंग्लंडने टी-२० विश्वचषक जिंकला तेव्हा तो संघाचा प्रमुख होता.