रोहित शर्मा-मोहम्मद सिराज(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ५५ सामने खेळवण्यात आले आहेत. ५६ वा सामना आज ६ मे रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यापूर्वी, जीटीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला एक खास भेट देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सोमवारी एक खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये रोहित शर्मा मोहम्मद सिराजला हिऱ्याची अंगठी देताना दिसून येत आहे. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, की सिराजला इतकी मौल्यवान भेट का देण्यात आली असावी? खरंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकला होता. २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयने हिऱ्याची अंगठी देऊन सन्मानित केले आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये नमन पुरस्कारांदरम्यान बोर्डाने चॅम्पियन खेळाडूंना हिऱ्याच्या अंगठ्या भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. त्या कार्यक्रमात सिराज उपस्थित नव्हता. अशा परिस्थितीत आता भारतीय कर्णधार रोहितकडून सिराजला अंगठी देण्यात आली आहे. अंगठी देताना रोहित म्हणाला की सिराजची कार्यक्रमात खूप आठवण आली. आपल्या प्रत्येकासाठी बनवलेली ही खास अंगठी तुला देताना मला अभिमान वाटत आहे.
अंगठी मिळाल्यानंतर सिराज खूप आनंदी दिसून आला. “चॅम्पियन,” तो हसत हसत म्हणाला. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकून ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला होता. रोहित ब्रिगेडने रोमांचक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून विजेतेपद आपल्या नावे केले होते. बार्बाडोसच्या मैदानावर १७६/७ धावा केल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला १६९/८ धावांवरच रोखले होते.
𝙈𝙤𝙢𝙚𝙣𝙩 𝙩𝙤 𝘾𝙝𝙚𝙧𝙞𝙨𝙝 👏@mdsirajofficial receives a special ring from #TeamIndia Captain @ImRo45 for his impactful contributions in the team’s victorious ICC Men’s T20 World Cup 2024 campaign 💍@Dream11 pic.twitter.com/dHSnS4mwu1
— BCCI (@BCCI) May 5, 2025
लागोपाठ सहा विजयांसह चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या पाच वेळा विजेते मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने उभे राहणार आहेत. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. सध्या पॉइंट टेबलमध्ये दोघांच्याहही खात्यात १४-१४ गुण आहेत. मुंबई इंडियन्सने ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. मुंबई पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे, तर गुजरात टायटन्सने १० पैकी ७ सामने जिंकून चौथ्या स्थानावर आहे.