आशिया चषकाचे (Asia Cup)बिगुल २७ ऑगस्ट रोजी वाजणार आहे. या स्पर्धेत भारताचा (India) पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan) होणार असून या सामान्याकडे सध्या सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. आशिया चषकासाठी सर्व खेळाडू यूएईत रवाना होत असताना भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) हा देखील आपल्या पत्नी आणि मुलांसह आशिया चषकासाठी दुबईत निघाला. मात्र यावेळी एअरपोर्टवर त्याला अतिशय वाईट वागणूक मिळाल्याचे त्याने सांगितले. या विषयी त्यांनी ट्विट करत संताप देखील व्यक्त केला आहे.
इरफान पठाण कुटुंबा सह मुंबईहून दुबईला निघाला असताना बुकिंग कन्फर्म असूनही त्याला दीड तास विमानतळावर थांबावे लागले. इरफान पठाणने ट्विट करत लिहिले की, “आज (बुधवार) मी विस्तारा फ्लाइट UK-२०१ ने मुंबईहून दुबईला निघालो होतो. चेक इन काउंटरवर मला अतिशय वाईट वागणूक मिळाली. विस्ताराने माझ्या कन्फर्म तिकिटात फेरफार केला. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मला सुमारे दीड तास काउंटरवर थांबावे लागले. माझ्यासोबत माझी पत्नी आणि मुलं पण होती. ग्राऊंड स्टाफचे वर्तनही अतिशय उद्धट होते आणि ते खूप कारणे देत होते. माझ्याशिवाय इतर अनेक प्रवाशांनाही अशाच समस्यांचा सामना करावा लागला आहे. मी संबंधित अधिकाऱ्याला विनंती करू इच्छितो की या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा कोणाला अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये”.
इरफान पठाणची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून यावर विविध प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.