फोटो सौजन्य - सोशल मिडिया
मागील अनेक वर्षापासून भारतामध्ये आंतरराष्ट्रीय सामने हे विशेषत: स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर दाखवले जातात. तर जिओहाॅटस्टारवर या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवली जाते. या संदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे.आगामी आयसीसी स्पर्धा फक्त दोन महिने असताना आता वृतांच्या माहितीनुसार आयसीसीचा करारातून जिओहाॅटस्टार माघार घेतली आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत होणार आहे, ज्याचे आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करणार आहेत.
स्पर्धा सुरू होण्याच्या दोन महिने आधी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) मोठा धक्का बसला आहे. जिओस्टार इंडिया मीडिया हक्कांपासून माघार घेऊ इच्छित आहे. जिओस्टारने आयसीसीला आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. जिओस्टारने या करारातून माघार घेण्याचे कारण म्हणून मोठ्या प्रमाणात तोटा असल्याचे सांगितले आहे. जर लवकरच दुसरा प्रसारक सापडला नाही, तर भारतात विश्वचषक सामने दाखवण्यात अडचणी येऊ शकतात. आयसीसीने नवीन प्लॅटफॉर्म शोधण्यास सुरुवात केली आहे.
द इकॉनॉमिक टाईम्समधील एका वृत्तानुसार, जिओस्टारने अधिकृतपणे प्रशासकीय मंडळाला कळवले आहे की ते भारतात आयसीसी कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा करार पुढे चालू ठेवू शकत नाहीत. कराराला अजूनही दोन वर्षे शिल्लक आहेत. विद्यमान चार वर्षांच्या मीडिया-राइट्स कराराअंतर्गत जिओस्टारला मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की २०२४-२७ हंगामासाठी जिओस्टारने भारतातील मीडिया हक्कांसाठी २०२३ मध्ये आयसीसीसोबत करार केला होता. २०२४-२७ हंगामासाठी हा करार $३ अब्ज (अंदाजे ₹२५,००० कोटी) किमतीचा होता. जिओस्टारला हा करार डिस्नेच्या स्टार इंडियाकडून वारशाने मिळाला आहे. जिओस्टारला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, ज्यामुळे आर्थिक तोटा वाढत आहे. डॉलरच्या मूल्यवाढीमुळे जिओस्टारचा भार वाढला आहे.
आयसीसीने २०२६-२९ च्या भारतातील मीडिया हक्कांसाठी एक नवीन विक्री प्रक्रिया सुरू केली आहे. आयसीसी अंदाजे $२.४ अब्ज डॉलर्सची मागणी करत आहे. आयसीसीने सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (एसपीएनआय), नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओसह अनेक प्रमुख प्लॅटफॉर्मशी संपर्क साधला आहे, परंतु कोणतेही करार अंतिम झालेले नाहीत. उच्च किंमतीमुळे कोणत्याही प्लॅटफॉर्मने मीडिया हक्कांमध्ये रस दाखवला नसल्याचे वृत्त आहे.






