रोहित शर्मा(फोटो-सोशल मिडिया)
MI vs RR : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात आतापर्यंत ५० सामने खेळवण्यात आले आहेत. काल झालेल्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा १०० धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहचली आहे. मुंबईचा हा या स्पर्धेतील लागोपाठ सहावा विजय ठरला. या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या अनुभवी फलंदाज रोहित शर्माने एक मोठी कामगिरी केली आहे. तो मुंबई इंडियन्ससाठी ६००० धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहित शर्माने ही कामगिरी केली आहे.
मुंबई इंडियन्सकडून ६००० धावा पूर्ण करण्यासाठी रोहित शर्माला फक्त २९ धावांची आवश्यकता होती. रोहितने २९ धावा करताच ६००० धावांचा टप्पा गाठून मुंबईसाठी इतिहास रचला. कुमार कार्तिकेयच्या फुल टॉस बॉलवर डीप स्क्वेअर लेगकडे स्वीप शॉट खेळून त्याने हे यश संपादन केले.
रोहितने मुंबई इंडियन्ससाठी २३१ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २ शतके आणि ३८ अर्धशकांच्या मदतीने ६००० हून अधिक धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने ४५०० हून अधिक चेंडूंचा सामना करताना ही कामगिरी करून दाखवली आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या इतर कोणत्याही फलंदाजाला ४००० धावांचा टप्पा पूर्ण करता आलेला नाही. या यादीत, किरॉन पोलार्ड ३९१५ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर सूर्यकुमार यादव ३४६० धावांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
हेही वाचा : GT vs SRH : Gujrat Titans पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्यास सज्ज! आज सनरायझर्स हैदराबादसोबत भिडणार..
सामन्यापूर्वी ‘विमलावा’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्मा म्हटला की, माझे ध्येय कधीही हंगामात सर्वाधिक धावा करणे नव्हते. माझ्या संघाने जास्तीत जास्त सामने जिंकावेत अशीच माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी नेहमीच माझे सर्वोत्तम प्रयत्न करत आलो आहे. जर तुम्ही ६००-७०० धावा केल्या पण संघाने ट्रॉफी जिंकली नाही, तर त्या धावांचा काही एक उपयोग राहत नाही.
रोहित पुढे म्हणाला की, मी २०१९ च्या विश्वचषकाकडून एक धडा शिकलो होतो. जर तुम्ही अंतिम फेरीत पोहोचू शकला नाहीत तर मी ५००-६०० धावा करून काय करू? ते माझ्यासाठी चांगलं असू शकतं, पण संघासाठी नाही. रोहित शर्मा पुढे म्हणाला की, आता माझे लक्ष फक्त धावा करण्यावर नाही तर संघासाठी उपयुक्त योगदान देण्यावर आहे. मुंबई इंडियन्सने जेव्हा जेव्हा ट्रॉफी जिंकली आहे तेव्हा आमच्या कोणत्याही खेळाडूने ऑरेंज कॅप जिंकलेली नाही याचे हे एक कारण आहे. आम्ही जास्तीतजास्त उपयुक्त डाव खेळण्यावर लक्ष केंद्रित करत असतो.
काल झालेल्या आयपीएल २०२५ च्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा १०० धावांनी पराभव केला आहे. या विजयासह मुंबईने लागोपाठ सहा सामन्यात विजय मिळवण्याची किमया साधाली. आरआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत मुंबईने २१७ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात राजस्थान संघ सर्वबाद ११७ धावाच करू शकला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर १०० धावांनी पराभूत केले.