सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मिडिया)
MI vs RR : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील काल झालेल्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर १०० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२५ मध्ये एक मोठी कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादव हा १८ व्या हंगामात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ११ सामन्यांमध्ये २५ किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. सलग ११ सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा तो आयपीएलच्या इतिहासातील एकमेव फलंदाज ठरला. या सामन्यात सूर्याने २३ चेंडूत नाबाद ४८ धावांची खेळी केली.
गुरुवारी (१ मे) जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध फलंदाजी करताना सूर्याने हा विक्रम मोडला. सूर्यकुमार यादवने शेवटच्या डावात ही कामगिरी करून रॉबिन उथप्पाची बरोबरी साधली होती. २०१४ मध्ये उथप्पाने सलग १० सामन्यांमध्ये २५ पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्यावेळी उथप्पा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता आणि विशेष म्हणजे त्या हंगामात कोलकाता संघाने आयपीएलचे विजेतपद देखील पटकावले होते.
हेही वाचा : MI vs RR : मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने रचला इतिहास! असा भीम पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
तसेच स्टीव्ह स्मिथने देखील २०१६-१७ मध्ये ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. तर साई सुदर्शनने २०२३-२४ मध्ये ९ वेळा आणि विराट कोहलीने २०२४-२५ मध्ये ९ वेळा हा पराक्रम केला आहे. तिघांनीही ९ वेळा २५ किंवा त्याहून जास्त धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने फक्त ११ चेंडूत २५ धावा काढल्या होत्या. राजस्थान रॉयल्सविरुद्ध सूर्यकुमार यादवने २३ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकार लगावले. सूर्यकुमार यादवने हार्दिक पंड्यासोबत मिळून मुंबईचा धावसंख्या २०० पार पोहचवली.
आयपीएल २०२५ च्या या हंगामात सूर्यकुमार यादवची सर्वात कमी धावसंख्या २६ धावा ही राहिली आहे. त्याने १७ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वात कमी धावा केल्या होत्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवने शेवटच्या तीन डावांमध्ये अर्धशतके झळकावून आपल्या संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. या काळात त्याचा स्ट्राईक रेट १७१.१५ इतका होता.