नुकत्याच पारपडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी दमदार कामगिरी दाखवून पदकांना गवसणी घातली. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या खेळाडूंसमोर २२ ऑगस्टपासून टोकियोत सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेमध्ये खडतर आव्हान असणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा ड्रॉ बुधवारी जाहीर करण्यात आला. यावेळी भारतीय खेळाडूंना कठीण ड्रॉचा सामना करावा लागणार आहे.
पी. व्ही. सिंधू हिने २०१९ मध्ये जागतिक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला होता. यंदा तिला ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. सिंधूला सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये हॅन यूए व वँग झी ई या दोन खेळाडूंचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या ॲन सी यंग या बॅडमिंटनपटूंशी तिला दोन हात करावे लागणार आहेत.
साईना नेहवालला हाँगकाँगच्या च्युअँग यी हिचा सामना करावा लागणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास साईनाला पुढील फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहरा हिचे कडवे आव्हान असणार आहे. मालविका बनसोड या भारताच्या महिला बॅडमिंटनपटूसमोर डेन्मार्कच्या लाईन ख्रिस्तोफरसन हिचा अडथळा असणार आहे.
टोकियोत सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेमध्ये महिलांप्रमाणे पुरुषांच्या एकेरीतही भारतीय खेळाडूंचा कस लागणार आहे. किदांबी श्रीकांत, लक्ष्य सेन व एच. एस. प्रणॉय हे भारतीय खेळाडू एकाच हाफमध्ये आहेत. त्यामुळे भारताचा एकच खेळाडू उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंत आगेकूच करू शकणार आहे. याशिवाय बी. साईप्रणीत हा भारताचा चौथा पुुरुष खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाला आहे. तर भारतीय खेळाडूंसाठी दुहेरी विभागातही तीच परिस्थिती असणार आहे. सात्विक रेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला मलेशिया व जपान या देशांमधील स्टार खेळाडूंना सामोरे जावे लागेल. गायत्री गोपीचंद-ट्रीसा जॉली या भारतीय जोडीसमोर सुवर्णपदक जिंकलेल्या पिअर्ली टॅन- तिन्नाह मुरलीधरन यांचे आव्हान असेल.