MS Dhoni : एमएस धोनीच्या रांचीतील बंगल्यावरून वाद; गृहनिर्माण मंडळाने पेच वाढवला; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
MS Dhoni Harmu Road Residence Controversy : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. हे प्रकरण त्यांच्या रांची येथील हरमू रोडवर असलेल्या त्यांच्या बंगल्याशी संबंधित आहे. झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने या निवासी जागेचा व्यावसायिक वापर केल्याच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे. या वृत्तानुसार, या मालमत्तेवर डायग्नोस्टिक सेंटर उघडण्याची योजना असल्याचे संकेत आहेत.
काय आहे प्रकरण
अर्जुन मुंडा मुख्यमंत्री असताना झारखंड सरकारने महेंद्रसिंग धोनीला हरमू कॉलनीत १०,००० चौरस फूट जमीन दिली होती. धोनीने या जमिनीवर एक आलिशान बंगला बांधला, जिथे तो आपल्या कुटुंबासह बराच काळ राहत होता. मात्र, नंतर तो सिमलिया येथील त्याच्या फार्महाऊसवर शिफ्ट झाला. या जागेवर डायग्नोस्टिक सेंटर बांधण्याची योजना असल्याची बातमी अलीकडेच आली होती. तक्रारींच्या आधारे गृहनिर्माण मंडळाने चौकशी सुरू केली. या बंगल्यावर पॅथॉलॉजी सेंटरचा फलक होता, तो नंतर झाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.
काय म्हणाले गृहनिर्माण मंडळ?
गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष संजय लाल पासवान म्हणाले, आम्ही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जर हे आरोप खरे ठरले तर एमएस धोनीला नोटीस बजावली जाईल. त्यानंतर मंडळाच्या नियमानुसार निवासी जमिनीचा व्यावसायिक वापर करण्यास मनाई आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास मालमत्तेचे वाटपही रद्द केले जाऊ शकते. त्यामुळे मालमत्ता ताब्यात घेतली जाईल.
या मालमत्तेचा यापूर्वीही झाला होता वाद
एमएस धोनीच्या हरमू कॉलनीतील मालमत्तेवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2015 मध्येही या जागेला लागून असलेल्या दुसऱ्या भूखंडावर बेकायदा कब्जा केल्याचा आरोप झाला होता. मात्र, नंतर हे प्रकरण मिटले. याशिवाय धोनीने या घराच्या छतावर स्विमिंग पूलही बनवला होता, या कारणावरून 2007 मध्ये शेजाऱ्यांसोबत वाद झाला होता.
हेही वाचा : Pro Kabaddi League 11 : अखेरच्या सामन्यात पुणेरी पलटणचा शानदार विजय; तमिळ थलैवाजवर ४२-३२ अशी मात