सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
Suryakumar Yadav created history : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने एक ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. या सामन्यात, सूर्यकुमार यादवने केवळ त्याच्या संघाला चांगली सुरुवातच करून दिली नाही तर टी-२० क्रिकेटमध्ये एक असा विक्रम देखील रचला आहे जो यापूर्वी जगातील फक्त चार फलंदाजांच्याच नावे आहे. या कामगिरीसह त्याने रोहित शर्मासारख्या दिग्गजाला देखील पिछाडीवर टाकले.
कॅनबेरा येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात, सूर्यकुमार यादवने दोन उत्कृष्ट षटकार खेचत त्याच्या टी-२० कारकिर्दीत १५० षटकारांचा टप्पा गाठला आहे. हा विक्रम करणारा तो जगातील फक्त पाचवा आणि भारतातील दुसराच खेळाडू ठरला. त्याच्या आधी, ही कामगिरी करण्याची किमया भारतीय संघाच्या हिटमॅन रोहित शर्माने करून दाखवली आहे. तथापि, सूर्याने रोहितपेक्षा कमी डावांमध्ये हा टप्पा गाठला आहे.
रोहित शर्माने १११ डावांमध्ये १५० षटकार मारले आहेत, तर सूर्यकुमार यादवने फक्त ८६ डावांमध्ये हा टप्पा सर केला आहे. यामुळे तो १५० टी-२० षटकार मारणारा सर्वात जलद भारतीय फलंदाज ठरला आहे. जगातील सर्वात जलद १५० षटकार मारण्याचा विक्रम संयुक्त अरब अमिरातीच्या मोहम्मद वसीमच्या नावावर जमा आहे, ज्याने ६६ डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. त्यानंतर सूर्यकुमारचा क्रमांक लागतो. न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने १०१ डावांमध्ये, रोहित शर्माने १११ डावांमध्ये आणि इंग्लंडच्या जोस बटलरने १२० डावांमध्ये हा विक्रम करण्याची किमया केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, सूर्यकुमार यादव हा पूर्ण सदस्य देशांकडून १५० षटकार मारणारा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे.
Milestone unlocked 🔓 1️⃣5️⃣0️⃣ sixes and counting for Captain @surya_14kumar in T20Is 🔥 Updates ▶️ https://t.co/VE4FvHCa1u#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/wyLphOxwII — BCCI (@BCCI) October 29, 2025
टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यातील सूर्यकुमार यादवने खेळलेली खेळी केवळ विक्रम मोडणारी नव्हती, तर फॉर्ममध्ये परतणे देखील उल्लेखनीय असेच होते. मागील पाच टी-२० सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव २० धावांपर्यंत देखील पोहोचू शकला नव्हता. २०२५ च्या आशिया कपमध्ये त्याची कामगिरी ही खूप निराशाजनक राहिली होती, जिथे त्याने सात सामन्यांमध्ये एकही अर्धशतक झळकावले नव्हते आणि फक्त एकदाच २० धावा ओलांडल्या होत्या. तथापि, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात तो आत्मविश्वासाने खेळताना दिसून आला.
कॅनबेरा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे दोनदा थांबला होता, अखेर पावसाने आपली फटकेबाजी सुरू ठेवली. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला आहे. टीम इंडियाने स्कोअरबोर्डवर १ गडी गमावून ९७ धावा केल्या होत्या. दरम्यान, भारताला पहिला धक्का अभिषेक शर्माच्या रूपात लागला आहे. शुभमन गिल ३७ धावा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव २४ चेंडूत ३९ धावा करून नाबाद राहिले.






