भारत वि पाकिस्तान सामना(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप २०२५ च्या(Asia cup 2025) सुपर ४ फेरीतील दूसरा सामना काल रविवारी, २१ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला सामन्यात परतण्याची कुठेच संधी दिली नाही. भारतीय सलामीवीर जोडी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी केलेली तूफान फटकेबाजी भारताचा विजय निश्चित करून गेली. त्यामुळे पाकिस्तान संघाला आशिया कप २०२५ स्पर्धेत दुसऱ्यांदा भारताकडून पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाने नव्या वादाला तोंड फोडले आहे.
पाकिस्तानी सलामीवीर फखर झमानला चुकीच्या प्रकारे बाद दिल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. टीव्ही पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचे पीसीबीचे म्हणणे आहे. पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यांनीही याला चुकीचा निर्णय संबोधले आहे. याबाबत आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फखर झमानने पाकिस्तान संघाच्या डावाची आक्रमक सुरुवात केली, त्याने ८ चेंडूत झटपट १५ धावा जोडल्या. या दरम्यान, तिसऱ्या षटकात भारतीय यष्टीरक्षक संजू सॅमसनने त्याचा झेल घेतला, परंतु मैदानावरील पंचांनी त्याला ताबडतोब बाद देण्याइतका हा निर्णय स्पष्ट नव्हता. त्यामुळे हा निर्णय टीव्ही पंच रुचिरा पलियागुरुगे यांच्याकडे गेला. ज्यांनी वेगवेगळ्या कोनातून विचार केल्यानंतर झमानला बाद जाहीर केले. त्यानंतर मात्र पाकिस्तान या निर्णयावर नाराज असल्याचे दिसून आले. एका वृत्तानुसार, पीसीबीचा असा विश्वास आहे की टीव्ही पंच रुचिरा पलियागुरुगे यांनी फखर झमानला चुकीच्या पध्दतीने बाद जाहीर केले. याविरोधात पीसीबीकडून आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फखर झमानच्या विकेटनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये दोन भाग पडले आहेत. काहींनी याला योग्य निर्णय असल्याचे म्हटले आहे तर काहींनी पंचांची चूक असल्याचे म्हटले आहे. तथापि, तिसऱ्या पंचाचा निर्णय अंतिम मानला जातो आणि एखाद्या संघाने पंचाच्या निर्णयाबद्दल आयसीसीकडे तक्रार करणे हे फार दुर्मिळ मानले जाते. परंतु, भारताविरुद्धचा हा पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागल्याने पाकिस्तान अशा कुरापती करताना दिसून येत आहे.
पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कर्णधार सलमान आगाने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, “अंपायर चुका करू शकतात. पण मला वाटले की चेंडू कीपरवरून उडी मारत असल्याचे दिसते. मी चुकीचा असू शकतो. फखर ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, जर त्याने पॉवरप्लेमध्ये तशीच फलंदाजी केली असती तर आपण १९० धावा ननक्की केल्या असत्या. मी चुकीचा असू शकतो, पण पंचाकडूनही चुक होऊ शक्यते. पण पंचांचा निर्णय हा अंतिम असतो.”