PSL मालकाने कायदेशीर नोटीस फाडून दिले थेट उत्तर; ‘या’ वादाचं नेमकं कारण काय? (Photo Credit - X)
PSL Owner Tears up Legal Notice: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील प्रमुख फ्रँचायझी ‘मुल्तान सुल्तांस’ (Multan Sultans) यांच्यात मोठा वाद पेटला आहे. पीएसएल टीमचे मालक अली खान तरीन (Ali Khan Tareen) यांनी पीसीबीने पाठवलेली कायदेशीर नोटीस (Legal Notice) कॅमेऱ्यावर सार्वजनिकपणे फाडून बोर्डाची उघडपणे नाचक्की केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पीएसएलला लवकरच १० वर्षे पूर्ण होत आहेत आणि मुल्तान सुल्तांस टीमची मालकी डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. त्यानंतर बोली लावून नवीन मालक निवडले जातील. अली खान तरीन यांनी यापूर्वी पीएसएल व्यवस्थापनावर टीका केली होती. या टीकेमुळे पीसीबीने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आणि बोली प्रक्रियेतून बॅन करण्याची धमकी दिली होती, तसेच व्हिडिओद्वारे माफी मागण्यास सांगितले होते.
The PSL Management has sent me a notice threatening to cancel Multan Sultans unless I offer them a public apology. Hazir Saeen. pic.twitter.com/yHWCcClXaD — Ali Khan Tareen (@aliktareen) October 23, 2025
अली खान तरीन यांनी आता त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत पीसीबीला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, व्यवस्थापनाने चुका सुधारण्याऐवजी त्यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवली. त्यांनी पीसीबीच्या धोरणांवर जोरदार टीका करत त्यांच्या चुका उघड केल्या. व्हिडिओच्या शेवटी, त्यांनी कायदेशीर नोटीस फाडून टाकली आणि “मला आशा आहे की तुम्हाला माझ्या माफीचा हा व्हिडिओ आवडला असेल,” असे उपहासाने म्हटले. या कृतीतून त्यांना पीसीबीच्या नोटिसीची पर्वा नसल्याचे स्पष्ट होते.
अली खान तरीन यांनी पीसीबीवर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर त्यांना चाहत्यांकडून भरभरून समर्थन मिळत आहे. अनेक चाहत्यांनी अली खान तरीन योग्य असल्याचे मत व्यक्त केले असून, पीसीबीच्या गुंडगिरीला असेच उत्तर मिळायला हवे, असे म्हटले आहे. एका चाहत्याने मोहसिन नक्वी (पीसीबीचे अध्यक्ष) यांच्यावर टीका करत, “मोहसिन नक्वी यांना त्यांच्या आसपास होय म्हणणारेच लोक हवे आहेत. आशा आहे की इतर टीम्ससुद्धा मुल्तान सुल्तांसच्या बाजूने उभ्या राहतील,” असे लिहिले.






