मुंबई : मागील काही दिवसांपासून भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दोघांचा घटस्फोट झाला असल्याच्या चर्चा रंगत आहेत. सानिया शोएबच्या जवळच्या मित्रांनीही ते दोघेच बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत राहत नसल्याची माहिती दिली होती. मात्र घटस्फोटाबाबत सुरु असलेल्या चर्चांवर या दोघांनीही मौन बाळगले आहे. अशातच आता शोएब मलिकने त्याच्या सोशल मीडियावर सानियाच्या प्रतिभेला उद्देशून काही शब्द लिहिले आहेत. ऐन घटस्फोटाची चर्चा असताना शोएबने लिहिलेले हे शब्द पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शोएब मलिकने त्याच्या इंस्टाग्राम बायोद्वारे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये “Husband to a superwomen @SaniaMirza” म्हणजेच ‘सुपरवुमनचा नवरा’ असे लिहिले आहे. तसेच शोएबने त्याचा आणि सानिया मिर्झाचा नवीन टॉक शो ‘द मिर्झा मलिक शो’चा टीझरही शेअर केला आहे.
शोएब मलिकने नुकतेच एक्सप्रेस ट्रिब्यूनसोबत संवाद साधला. यावेळी त्याने सांगितले की, ‘ही माझी आणि सानियाची वैयक्तिक बाब आहे. मी किंवा माझी पत्नी सानिया मिर्झा या प्रकरणावर कोणतेही उत्तर देत नाही’. सानिया मिर्झाने 2010 मध्ये शोएब मलिकशी लग्न केले आहे. परंतु लग्नाला १२ वर्षपूर्ण झाल्यानंतर काही दिवसांपासून त्यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. परंतु शोएबने सानियाला सुपरवुमन संबोधल्यामुळे चाहत्यांच्या मनात हे दोघे नक्की वेगळे झाले आहेत की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.