Team India (Photo Credit-X)
T20 World Cup 2026 Schedule: आशिया कप 2025 ची (Asia Cup 2025) तयारी सुरू असतानाच आयसीसीकडून (ICC) एक मोठी बातमी येत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026) संभाव्य तारखा समोर आल्या आहेत. या स्पर्धेचे यजमानपद भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्याकडे असून, यामध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत.
2026 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकचे सामने भारत आणि श्रीलंकेत होतील. अद्याप या स्पर्धेचे वेळापत्रक किंवा सामने कुठे होणार हे जाहीर झालेले नाही, मात्र क्रिकइन्फोच्या एका रिपोर्टनुसार, या स्पर्धेचे आयोजन 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण एक महिना क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल आणि 8 मार्चला या स्पर्धेचा नवा विजेता मिळेल. विशेष म्हणजे, भारतानेच 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून टी-20 विश्वचषकचे विजेतेपद पटकावले होते.
Next year’s men’s T20 World Cup is likely to take place from February 7 to March 8 in India and Sri Lanka, with the final to be held in Ahmedabad or Colombo
Full story: https://t.co/LImYpNQBGU pic.twitter.com/ZdkU91alcs
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 9, 2025
दरम्यान, पाकिस्तानचा संघ आपले सर्व सामने श्रीलंकेतच खेळेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. अंतिम सामन्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, पण तो अहमदाबाद किंवा कोलंबोमध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा संघ अंतिम सामन्यात पोहोचतो की नाही, यावर अंतिम स्थळाचा निर्णय अवलंबून असू शकतो. आयसीसीकडून लवकरच तारखांना अंतिम स्वरूप दिले जाईल आणि सहभागी संघांच्या बोर्डांना याची माहिती दिली जाईल असेही समजते.
2024 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकप्रमाणेच 2026 च्या स्पर्धेतही 20 संघ सहभागी होतील. या संघांना प्रत्येकी 5 च्या गटात विभागले जाईल. एकूण चार गट असतील. प्रत्येक गटातील टॉप 2 संघ सुपर एटमध्ये पोहोचतील. त्यानंतर चार संघांमध्ये सेमीफायनल होईल आणि त्यातील विजेत्या संघात अंतिम सामना रंगेल.
टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सहभागी होणाऱ्या 20 संघांपैकी 15 संघ पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, नेदरलँड्स आणि इटली या संघांचा समावेश आहे. उर्वरित पाच संघांपैकी दोन आफ्रिका पात्र फेरीत तर तीन आशिया आणि पूर्व आशिया-पॅसिफिक पात्र फेरीत निवडले जातील.