भारतीय संघातील वाद चव्हाट्यावर; रोहित-गौतम गंभीरच्या निर्णयावर अजित आगरकर नाराज; BCCI कडे केली तक्रार
Indian Team Management Meeting : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-0 असा व्हाईटवॉश झाल्यापासून भारतीय संघ व्यवस्थापनावर हल्ला होत आहे आणि आता समन्वयाचा अभाव असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ज्यामुळे भारतीय क्रिकेटचे चांगले चित्र समोर येत नाही. BCCI च्या बैठकीत टीम इंडियाच्या नेत्यांमध्ये एकमत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
मालिकेपूर्वीच संघ व्यवस्थापनातील मतभेदाच्या बातम्या समोर
या पराभवामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-3 असा व्हाईटवॉश झाल्यापासून कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या निशाण्यावर आहेत. अशा परिस्थितीत संघाला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जायचे आहे. मात्र, त्या मालिकेपूर्वीच संघ व्यवस्थापनातील मतभेदाच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत, हे भारतीय क्रिकेटसाठी चांगले लक्षण नाही. एका अहवालानुसार, बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर कसोटी मालिकेदरम्यान संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर नाराज होते आणि त्यांनी BCCI कडे तक्रारही केली होती. हा अहवाल BCCI च्या बैठकीनंतर आला आहे. ज्यामध्ये बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षक, कर्णधार आणि मुख्य निवडकर्त्यांसोबत पराभवाच्या कारणांवर चर्चा केली.
BCCI चे अधिकारी नाराज
12 वर्षांनंतर प्रथमच मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर आणि 92 वर्षांत प्रथमच 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप झाल्यामुळे भारतीय चाहते आणि BCCI अधिकारी खूप दुःखी होते. त्यानंतरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी संघ व्यवस्थापनासोबत कामगिरीचा आढावा घेतला जाईल आणि ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी रोडमॅपवरही चर्चा केली जाईल, असे ठरले. गुरुवार 7 नोव्हेंबर रोजी मुंबईतील बोर्डाच्या कार्यालयात ही बैठक झाली, ज्यामध्ये काही निर्णयांव्यतिरिक्त प्रशिक्षक गौतम गंभीरच्या कार्यपद्धतीवरही चर्चा करण्यात आली.
या निर्णयामुळे आगरकर नाराज असल्याची तक्रार
या बैठकीत निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्या तक्रारीवरही चर्चा झाल्याचा दावा टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात करण्यात आला आहे. अजित आगरकरची ही तक्रार स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याबाबत होती. मुंबईत झालेल्या शेवटच्या कसोटीत बुमराह खेळला नव्हता. मुंबई कसोटी सामन्यापूर्वी बुमराहला विश्रांती देण्याच्या कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या निर्णयावर अजित आगरकर नाराज असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. त्याच्या नाराजीचे कारण म्हणजे संघ व्यवस्थापनाने त्याला किंवा निवड समितीतील कोणालाही या निर्णयाची माहिती दिली नाही आणि एकतर्फी निर्णय घेतला. आगरकर यांनी याबाबत बीसीसीआयकडे तक्रार केली होती, त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन एकमताने काम करण्यावर भर दिला होता.
बुमराहची कामगिरी चांगली नव्हती
ही मालिका बुमराहसाठी चांगली नव्हती आणि तो 2 कसोटी सामन्यात केवळ 3 विकेट घेऊ शकला. दुसऱ्या कसोटीतच मालिका गमावल्यानंतर बुमराहला विश्रांती दिली जाईल, जेणेकरून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तो फ्रेश राहू शकेल, असे मानले जात होते. मुंबई कसोटी सुरू होताच, बीसीसीआयने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की बुमराह व्हायरल संसर्गातून पूर्णपणे बरा होऊ शकला नाही आणि त्यामुळे त्याला संघातून मुक्त करण्यात आले. आता ताज्या अहवालानंतर, बुमराह खरोखरच आजारी होता की त्याला सोडण्याचे हे केवळ निमित्त होते का, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.