टी-२० विश्वचषकातील गट एक मध्ये आज उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन सामने रंगणार आहे. यातील एक सामना हा न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड तर एक सामना अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका असा होणार आहे. गट एक मधील हे चारही संघ उपांत्य फेरी मध्ये जाण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर भिडणार असल्यामुळे या दोन्ही लढतींकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार असून सकाळी ९:३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. तर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ब्रिस्बेन येथेच दुपारी १:३० वाजता सामना खेळवला जाणार आहे.
केन विल्यमसनच्या नेतृत्वात मैदानात उतरणारा न्यूझीलंडचा संघ यंदाच्या स्पर्धेमध्ये छान खेळ करीत आहे. सलामीच्या लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर त्यांची अफगाणिस्तानविरुद्धची लढत रद्द झाली. त्यानंतर श्रीलंकेला पराभूत करण्यात त्यांना यश लाभले. आता उद्या त्यांनी इंग्लंडवर विजय मिळवल्यास उपांत्य फेरीत पोहोचणारा न्यूझीलंडचा पहिलाच संघ असेल.