Virat Kohli (Photo Credit- X)
Virat Kohli On Bengaluru Stampede: आयपीएल 2025 चा (IPL 2025) हंगाम अनेक कारणांमुळे खास होता, पण त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने (RCB) 18 वर्षांनंतर अखेर विजेतेपद पटकावले. संपूर्ण देश आनंदात असताना, नियतीने घात केला आणि 4 जून रोजी बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने देशाला हादरवून सोडले. आरसीबीच्या विजयानंतर झालेल्या या दुःखद अपघातात 11 लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर 56 जण गंभीर जखमी झाले. व्यवस्थापनातील त्रुटींमुळे हा अपघात झाल्याचे समोर आले. या हृदयद्रावक घटनेवर आता विराट कोहलीने मौन तोडले असून, पीडितांच्या कुटुंबीयांसाठी एक भावनिक संदेश पाठवला आहे.
आरसीबीने नुकतीच RCB Cares नावाची एक संस्था सुरू करण्याची घोषणा केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून, चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली जाणार आहे. आरसीबीच्या अधिकृत वेबसाइटवर विराट कोहलीचे एक निवेदन प्रसिद्ध झाले आहे. या निवेदनात कोहली म्हणाला, “4 जून रोजी घडलेल्या हृदयद्रावक घटनेसाठी कोणीही तयार नव्हते. आमच्या फ्रँचायझीसाठी आनंदाचा क्षण एका दुःखद घटनेत बदलला. ज्यांनी आपले प्रियजन गमावले किंवा जखमी झाले, त्या सर्व कुटुंबांचा मी विचार करत आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे नुकसान आता आमच्या कथेचा भाग आहे. आपण सर्वजण आता काळजी, सन्मान आणि जबाबदारीने एकत्र पुढे जाऊ.”
Virat Kohli on the tragic events in Bengaluru. pic.twitter.com/MwMgMb9JaJ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 3, 2025
आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने अचानक चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयाचा उत्सव साजरा करण्याची घोषणा केली. आयोजनात योग्य नियोजनाचा अभाव होता आणि पुरेसे पोलिस कर्मचारीही उपलब्ध नव्हते. आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जमली, ज्यामुळे स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. कर्नाटक उच्च न्यायालयाने या घटनेसाठी आरसीबी, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला जबाबदार धरले आहे.
या घटनेनंतर, कर्नाटक सरकारने चिन्नास्वामी स्टेडियमला ‘असुरक्षित’ घोषित केले आहे. यामुळे, महिला विश्वचषकाचे सामने बंगळूरुमधून नवी मुंबईला हलवण्यात आले आहेत. तसेच, स्थानिक क्रिकेट लीग महाराजा टी-20 चे सामनेही बंगळूरुऐवजी म्हैसूर येथे खेळवले जात आहेत. बंगळूरुमध्ये लवकरच 60,000 प्रेक्षक क्षमतेचे नवीन स्टेडियम बांधले जाणार आहे, अशी माहितीही समोर आली आहे.